महाराष्ट्राचा सुपुत्र झाला नेदरलँडचा पोलीस अधीक्षक

3

सामना प्रतिनिधी । मुंबई

केवळ सहा वर्षांचा असताना एका डच दांपत्याने 1976 रोजी त्याला मुंबईतील डोंगरीच्या सुधारगृहातून दत्तक घेतले आणि त्याचे आयुष्यच बदलले. त्याने कधी कल्पनाही केली नसेल आपल्या आयुष्याचे असे सोने होईल. तब्बल 42 वर्षांनी महाराष्ट्राचा सुपुत्र मुंबईत आलाय ते नेदरलँड्सचा मुख्य पोलीस अधीक्षक बनून. ज्या सुधारगृहात त्याने आपल्या इतर अनाथ दोस्तांना पाहिले होते त्या सुधारगृहाचे आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने तो मुंबईत आलाय. जमील म्युसन असे त्यांचे नाव असून त्यांनी या डोंगरी सुधारगृहाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे.

अनाथ आणि अत्यंत अडचणीत सापडलेल्या मुलांना डोंगरीच्या सुधारगृहातून अंधेरीच्या सेंट कॅथरीन या अनाथालयात पाठवण्यात येत होते. त्याप्रमाणे जमील यांनाही अंधेरीच्या अनाथालयात पाठवण्यात आले. या अनाथालयातून त्यांना डच दांपत्याने दत्तक घेतले. जमील हे दोन वर्षे डोंगरीच्या सुधारगृहात होते. या नव्या आईवडीलांनी मला खुप प्रेम दिल्याचे जमील सांगतात. त्यांनी मला सर्वकाही दिले. जणूकाही आपल्याच काळजाचा तुकडा असल्यासारखे सांभाळले. मला इतके प्रेमळ आईवडील मिळाल्यामुळे मी स्वत:ला खुप नशीबवान समजतो असे जमील यांनी सांगितले. दरम्यान, 2013 मध्ये मी डोंगरीच्या सुधारगृहात माझ्या अस्तित्वाचे कागदोपत्री पुरावे मागितले होते. परंतु,त्यांच्याकडे कुठलेही पुरावे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. मला केवळ माझे पहीले नाव कळले. माझ्या कुटूंबाबद्दल मात्र मला काहीच समजू शकले नाही. कदाचीत डीएनए चाचणीने तेदेखील कळू शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

चारवेळा सुधारगृह आणि अनाथालयाला भेट
जमील 1986 रोजी 16 वर्षांचे असताना डोंगरी सुधारगृह आणि अंधेरीच्या अनाथालयात आले होते. त्यांनी चारवेळा सुधारगृह आणि अनाथालयाला भेट दिली. आता मला माझ्या भावा-बहीणींसाठी काहीतरी करायचेय. सुधारगृह आणि अनाथालयातील मुलांसाठी मी अनेक उपक्रम राबवणार आहे. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सुधारगृहाचा कायापालट करणार असल्याचे जमील यांनी सांगितले.

मोठ्या कंपन्यांनी आर्थिक मदत करावी
सुधारगृहातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मोठ्या कंपन्यांनी पुढे येऊन आर्थिक मदत करावी. या मुलांना चांगले शिक्षण मिळावे. यासाठी कंपन्यांनी पुढे यावे असे आवाहन जमील यांनी केले आहे. नेदरलँड्समध्ये गेल्यानंतर मी प्रचंड मेहनतीने शिकलो, संघर्ष केला आणि इथपर्यंत आल्याचे जमील यांनी सांगितले.

हे माझे घर आहे
डोंगरीतले सुधारगृह आणि अंधेरीतले अनाथालय हे माझे घरच आहे. येथील आजूबाजूचा परिसरही खुप सूंदर आहे. मला सुधारगृहाचे गेट अजूनही आठवते. मी नेदरलँड्सला होतो तेव्हा हेच गेट माझ्या डोळ्यांसमोर यायचे. 1986 रोजी मुंबईत आल्यानंतर मला तेच गेट दिसले. या सुधारगृहाशी माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळेच मला पुन्हा पुन्हा मुंबईत यावेसे वाटते असे जमील यांनी सांगितले. या आठवड्यात त्यांनी सुधारगृहाला भेट दिली तेव्हा त्यांनी वार्ताहरांना आपले अनुभव सांगितले.