आफ्रिकन म्हणू नका, ‘ते’ हिंदुस्थानीच!

Kavita-Lakhe_small>> कविता लाखे

[email protected]

उंचीपुरी देहयष्टी, गडद काळा वर्ण, छोटे कुरळे केस, अशी व्यक्ती दिसली की आपण लगेच ती व्यक्ती आफ्रिकन आहे असा समज करून घेतो. काही दिवसांपूर्वी मलाही अशाच वर्णाचा एक पुरूष अचानक भेटला आणि तो माझ्याशी चक्क अस्खलित मराठीत बोलू लागला. मला धक्काच बसला. आफ्रिकन माणूस इतकं चांगलं मराठी कसं काय बोलू शकतो? मात्र त्याने सांगितलं की, ‘मी आफ्रिकन नाही, तर हिंदुस्थानी आणि तोही तुमच्या इतका १०० टक्के हिंदुस्थानी’ आहे. माझा विश्वासच बसत नव्हता. मग कुतुहलापोटी मी पुन्हा एकदा त्या व्यक्तीला त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत भेटले त्यातून मला सगळी उत्तरं मिळाली. तिच ओळख मी या मुलाखतीच्या माध्यमातून करून देत आहे.

त्याच नाव आहे जुजे जॅकी हरनोडकर. नावातच गंमत आहे नाही का? मला हे नाव ऐकल्यावर दिलीप प्रभावळकर यांनी ‘हसवा-फसवी’मध्ये रंगवलेले दिप्ती प्रभावळकर-पटेल-लुगुंबा भूमिकेची आठवण झाली. इंडो-आफ्रिकनचा हा दुवा मला जुजे जॅकी हरनोडकर यांच्या नावातून सापडला. त्यांच्या समाजाबद्दलची माझी उत्सुकता वाढली होती म्हणून मी त्यांना सहकुटुंब भेटण्याचं आमंत्रण दिलं. त्यांनीही कोणतेही आढेवेढ न घेता आमंत्रण स्वीकारलं आणि एका हॉटेलात आम्ही सगळे भेटण्याचं ठरलं. मुलाखतीच्या दिवशी जीन्स, सफेद टी शर्ट, घातलेला, पाठीवर रेंगाळणाऱ्या काळ्याभोर जटा झाकण्यासाठी डोक्यावर रुमाल बांधणाऱ्या आफ्रिकन वंशाच्या जुजे हरनोडकरला बघून मला भन्नाट आनंद झाला… हे कुटुंब आतमध्ये येताच सगळ्या रेस्टॉरंटच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. तसा तो अस्वस्थ झाला. एखाद्या फॉरेनरला बघावं तसे सगळेजण त्या तिघांकडे डोळे विस्फारून बघत होते. कोणी एकमेकांच्या कानात कुजबुजत. कुत्सित हसतानाही दिसले. पण तो शांत होता. त्याने त्यासर्वांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच मला पटकन जाणवलं. हात हलवून मी त्याला कोपऱ्यावरच्या टेबलाकडे येण्याचा इशारा करताच त्याने स्मितहास्य केलं आणि तो कुटुंबासह माझ्यासमोर येऊन उभा राहिला.

इंग्रजीतून एकमेकांचा परिचय झाल्यानंतर इतर विषयांवर हलक्या फुलक्या गप्पा सुरू झाल्या. एव्हाना वातवरणात मोकळेपणा आला होता. त्याची पत्नी ज्युलियाना व मुलगाही बऱ्यापैकी त्या वातावरणात रुळले होते. शेकडो वर्षांपासून हिंदुस्थानात राहणाऱ्या, हिंदुस्थानी संस्कृतीशी समरस झालेल्या, या आफ्रिकी कुटुंबाला ते हिंदुस्थानी कसे हा प्रश्न विचारण मला कठीण जात होतं. पण सरळ विचारलं जुजे मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचय. तसा तो हसला.. त्याच्या त्या गडद कांतीवरही एक मस्त स्मितहास्याची लकेर नकळत उमटलीच. काय माहिती हवी आहे तुम्हांला. जुजेच्या तोंडातून हे अस्खलित मराठी ऐकूण मला मात्र आश्चर्याचा धक्का आधीच बसला होता. म्हणून मी त्यांना विचारलं तुम्हांला मराठी येतं. माझ्या या प्रश्नावर जुजे जोरात हसले. मॅडम मी आता मुंबईकर आहे. मराठी माझ्या कणाकणात आहे. ‘आय फिल सेफ इन मुंबई’ म्हणून गेली वीस वर्ष नोकरीनिमित्त मुंबईत राहतोय. हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड या भाषा येतात मला. इतर भाषा मात्र थोड्याफार समजतात. जुजेंचे हे बोलणे ऐकून मला जबरदस्त झटका बसला होता. आफ्रिकन वंशाच्या माणसाला हिंदुस्थानी भाषा बऱ्या येतात. असं उगाच वाटलं. पण मी चुकत होते. कारण जुजे व त्याची माणसं आता फक्त वर्णाने आफ्रिकी वंशाची आहेत. हृदयाने आणि मनाने ते तुमच्या माझ्या एवढेच १०० टक्के हिंदुस्थानी आहेत हे मला त्याच्याशी बोलताना स्पष्टपणे जाणवत गेलं.

हिंदुस्थानमधून जाताना पोर्तुगीज आणि इंग्रज बरच काही मागे सोडून गेलेत. देखण्या भव्य इमारती, लायब्ररी, मोठाले चर्च आणि बरचं काही. पण अशा अनेक निर्जिव वास्तूंबरोबरच इंग्रज काही जिवंत माणसांनाही वापरुन इथेच टाकून नव्हे तर अक्षरश: फेकून गेलेत. ही माणसं आजही महाराष्ट्र, गुजरात, गोवा व देशाच्या कुठल्या ना कुठल्या तरी जंगलात आदिवासींच आयुष्य जगत आहेत. ते आहेत आफ्रिकी वंशांचे हिंदुस्थानी. ‘सिदी’ अस त्यांच्या जमातीचं नाव. जे आपल्या पैकी कितीजणांना आजमितीला ठाऊकही नाही. दिसायला आफ्रिकी असल्यामुळे हिंदुस्थानी असूनही ते कोणालाच कधी आपले वाटले नाहीत. यामुळे उपजतच अनेक गुण संपन्न असलेली ही जमात देशाचे नागरिक असूनही अनेक मूलभूत हक्कांपासून वंचित आहे.

siddhis

हिंदुस्थानमध्ये येताना इंग्रजांनी आपल्याबरोबर मोठा लवाजमा आणला. हत्ती, घोडे, नोकर चाकर आणि गुलामांचा जत्था. दक्षिण आफ्रिका, केनिया, इथिओपिया, टांझानिया अशा आफ्रिकन देशातून हे गुलाम आणण्यात आले होते. आफ्रिकन वंशांची असल्याने उंचीपुरी धिप्पाड देहयष्टी, अंगात असलेली विजेच्या चपळाई व पडेल ते काम करण्याची वृत्ती यामुळे इंग्रज यांच्याकडून गुलामगिरीबरोबरच सैनिकी काम करून घेत. यातील बहुतेकांना तर सैनिकी शिक्षण देऊन लढाईवर पाठवल होतं असं जुजेने आवर्जुन सांगितलं. पण हिंदुस्थानवर दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर जाताना मात्र इंग्रज या लोकांना सोबत न घेता निघून गेले. इंग्रजांचे गुलाम बनून हिंदुस्थानात आलेल्या या जमातीला नंतर कोणीच वाली उरला नाही. पुन्हा आफ्रिकेत जावं तर जवळ तेवढा पैसा नाही, यामुळे या लोकांना हिंदुस्थानमध्ये राहण्याशिवाय पर्याय नव्हता. यामुळे या लोकांनी जंगलातच संसार थाटण्यास सुरुवात केली व हिंदुस्थानलाच आपला देश मानलं. हळूहळू ही माणस गावातल्या लोकांबरोबर रुळू लागली. त्यातूनच मग भाषेची जडणघडण झाली. आडनावही बदलू लागली. कर्नाटक व महाराष्ट्रात राहणाऱ्या सिदींच्या आडनावांपुढे ….कर येऊ लागलं. तशी त्यांची ओळखही बदलत गेली. पण यांच्या मुलांच भविष्य मात्र अंधारात. कारण यांना कोणीही हिंदुस्थानी मानायला तयार नव्हते. यामुळे आश्रितांच जगण त्यांच्या नशीबी आली. त्यातून मग काही जणांनी वेगवेगळे धर्म स्वीकारले. हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन जो जवळचा वाटेल अशा धर्माची वाट अनेकांनी धरली. पोटाला चिमटे बसतात तेव्हा पोट भरणारा धर्मच मोठा ठरतो असंच काहीस या सिदींच्या बाबतीत झालं आणि ते धर्माच्या राजकारणात विभागले गेले. यातील काहीजणांनी तर इंग्रजांविरोधातील स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन हिंदुस्थानसाठी हौतात्म स्वीकारलय पण आफ्रिकी वंशाचे असल्याने कोणीही त्याची साधी नोंद घेतलेली नाही. यामुळे स्वातंत्र्याच्या इतिहासात सिदीचा मागसूमही सापडत नाही.

juju-with-villager

पण काळानुसार सगळं बदलत गेलं. हळूहळू लोक सिदींना ओळखू लागले. त्यांच्यातील शारीरिक क्षमतांचा अनेकजण घरगुती कामांसाठी उपयोग करून घेऊ लागले. त्यांच्याबद्दल चर्चा होऊ लागल्या होत्या. याच काळात सिदी जमातीकडे सरकारच लक्ष गेल. तेव्हा आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये अमेरिकेकडून कृष्णवर्णिय लोकांना खेळवलं जात होतं, या लोकांमध्ये असलेले फिटनेस बघूनच अमेरिकेनं त्यांना देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळात उतरवले होतं आणि कृष्णवर्णीयांनी ते खरंही करुन दाखवलं. सुवर्ण पदांची लयलूट करत खेळजगतात त्यांनी अमेरिकेचे नाव अधोरेखित केलं. हे बघून १९८७ साली स्पोर्टस ऑथेरिटी ऑफ इंडियाने स्पेशल एरिया गेम्स स्कीम नावाची योजना राबवली. याअंतर्गत आफ्रिकी वंशाच्या सिद्दी जमातीतील काही तरुणांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये हिंदुस्थानच प्रतिनिधित्व करण्यासाठी जुजे व इतर तरुणांची निवड करण्यात आली. मोठा गाजावाजा करत त्यांना दिल्लीला नेण्यात आले. देहयष्टी, व अंगातील लवचिकता बघून अॅथिलिटीक्स खेळासाठी त्यांची निवड करण्यात आली. ट्रेनिंग सुरू झाले. उपजतच चपळ व काटक असलेल्या या जमातीतील मुलांनी सरावामध्येही धमाल उडवून टाकली होती. सराव सामन्यात त्यांनी अनेक पदक जिंकली. यामुळे या समाजाच्या आशा उंचावल्या. आता तरी आपल्याला हिंदुस्थानी म्हणून ओळख मिळेल अशी आशा त्यांच्या मनात घर करू लागली. रानावनातून बाहेर येऊन आमचीही मुलं इतर मुलांबरोबर शाळा शिकतील मोठी होतील. हिंदुस्थानसाठी खेळतील देशाबरोबर आमचंही नाव मोठ करतील अशी स्वप्न सिध्दी बघू लागले. पण कुठेतरी माशी शिंकली आणि एक दिवस अचानक या सर्व मुलांना दिल्लीश्वरांनी गाडीत बसवून आपआपल्या गावी पाठवलं आणि सिदी पुन्हा जंगलात लुप्त झाले.

जुजे हरमोडकर आज ४४ वर्षाचे असून सरकारी नोकरीत आहे. सिदी जमातीमधील जुजे सारखीच काहीजण जिद्द व चिकाटीच्या जोरावर आज हिंदुस्थानात वेगळे स्थान मिळवण्यात यशस्वी झाली आहेत. पदरमोड करुन सिदी मुलांना शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कुठल्याही खेळात फिट बसणारी देहयष्टी, चपळता हे गुण असल्याने जुजे या मुलांसाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. मिळेल तेव्हा जमेल तेवढी मदत करून ते या मुलांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण केवळ आफ्रिकन वंशाचे असल्याने त्यांना पुढे आणण्यासाठी कोणी तयार होत नाही. ‘जर या उपेक्षित हिंदुस्थानींना कोणी मदतीचा हात दिला व्यवस्थित प्रशिक्षण दिलं तर २०२४ साली होणाऱ्या ऑलिंम्पिकवर हिंदुस्थानची मोहर लागल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वास जुजे व त्याच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. फक्त एका मदतीच्या आशेवर आजही हा समाज योग्य व्यक्तीची वाट बघत आहे. जो फक्त सिदीच नाही तर हिंदुस्थानचेही भविष्य बदलवू शकतो. जगभरातील अनेक देशांनी या सिदी जमातीची दखल घेतली असून त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवल्या आहेत. आफ्रिकाही त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे. पण शेकडो वर्षापासून हिंदुस्थानशी सिदींची जुळलेली नाळ त्यांना या मातीपासून विभक्त होऊ देत नाही. या मातीने आम्हाला कधीच स्वीकारलं आहे, हळूहळू हा देश आम्हांला स्वीकारेल या एकाच विश्वासावर सिदी जमात हिंदुस्थानच्या जंगलात जीवन जगत आहे.