पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा खंडित करू नका – राज्यमंत्री दादा भुसे

सामना ऑनलाईन, नाशिक

आधी दुष्काळ, त्यानंतर परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना महावितरणने पूर्वसूचना न देता ट्रान्सफॉर्मर्स बंद केले, या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेवून महावितरणची दडपशाही रोखण्याचे साकडे घातले. पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा खंडीत करू नका, कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांना थकीत वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्यात ट्रान्सफॉर्मर्स बंद करून कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडीत केल्याने असंतोषाचे वातावरण आहे. साधी केबल वायर, फ्यूज जोडणी, ऑईल बदलणे अशा किरकोळ कामांसाठी देखील कर्मचारी पैशांची मागणी करून वेठीस धरत असल्याने ग्रामस्थांनी राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी रविवारी शासकीय विश्रामगृह येथे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसह तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर महिनोंमहिने बदलून दिले जात नाही, थकीत वीजबिलामुळे ट्रान्सफॉर्मर बंद केल्याने रब्बी हंगामाची कामे खोळंबली असून, अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, या तक्रारींची दखल घेत राज्यमंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले, शेतकरी संकटात असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी कर्मचारी पिळवणूक करीत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याचे, पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडीत न करण्याचे निर्देश दिले. किरकोळ कामे आठ दिवसात मार्गी लावावी, फेरजोडणीसाठी कोणत्याही शुल्काची आकारणी करु नये, तोडलेली वीजजोडणी त्वरित जोडावी, असेही सांगितले.

यावेळी गावोगावचे सरपंच, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य व शेतकऱ्यांनी महावितरणचा अनागोंदी कारभार निदर्शनास आणून दिला. प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील राठोड यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. या बैठकीला माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, बाजार समिती उपसभापती सुनील देवरे, धर्मराज पवार, कारभारी आहेर, भरत देवरे, दीपक मालपुरे, सुनील चांगरे यांसह तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.