पारंपरिक मासेमारी क्षेत्रात वॉटर स्पोर्टस् नको : बंदर अधिकाऱ्यांना घेराव

सामना प्रतिनिधी, मालवण

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पारंपरिक मच्छीमारी (रापण) क्षेत्रात सुरू असलेल्या जलक्रीडा प्रकारावर (वॉटर स्पोर्टस्) बंदर विभागाने तत्काळ निर्बंध घातले पाहजेत. पारंपरिक मच्छीमार उद्ध्वस्त करून बंदर विभाग अधिकृतबरोबरच अनधिकृत वॉटर स्पोर्टस्ला अभय देत असेल तर आम्हा पारंपरिक मच्छीमारांनाही आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा मालवण श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी यांनी बंदर अधिकाऱ्यांना दिला आहे. या वेळी सुमारे ७० मच्छीमार उपस्थित होते.

श्रमिक मच्छीमार संघ तसेच मेस्त, तोडणकर, वाईरकर, उभटकर, झाड, कुबल, टिकम, भगत रापण संघ व्यावसायिक यांनी बुधवारी मालवण बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांची भेट घेतली. मासेमारी अधिनियम १९८१ नुसार ० ते १० वाव समुद्री मासेमारी क्षेत्र पारंपरिक (विना यांत्रिक) मच्छीमारांसाठी राखीव आहे. महाराष्ट्र शासन मत्स्य विभागात याबाबत तरतूद आहे. त्यामुळे मच्छीमारांसाठी राखीव असलेल्या या क्षेत्रात जलक्रीडा व्यावसायिकांना बंदर विभागाने परवाने देऊ नये अशी मागणी मच्छीमारांनी केली. वॉटर स्पोर्टस् मुळे मासेमारीवर परिणाम होत असल्यामुळे आम्हा मच्छीमारांच्या जाळीत मासळी मिळत नाही. आमच्याकडे यांत्रिक साधने नसल्यामुळे आम्ही खोल समुद्रात जाऊ शकत नाही. एका रापण संघात ४० ते ५० सदस्य असतात. त्यावर कुटुंबे चालतात असे मच्छीमारांनी सांगितले. दरम्यान, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला जाईल,असे बंदर अधिकाऱ्यांनी सांगितले.

आधी मासेमारी जगवा, मग पर्यटन
कोकण किनारपट्टीवर मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. आता पर्यटन व्यवसाय वाढत असला तरी पर्यटनाचे ठोस धोरण नाही. त्यामुळे पर्यटनाच्या नावाने जिल्ह्याला सूज आली आहे. आलेला पर्यटक मासे खाण्याला प्राधान्य देतो. त्यामुळे मासेमारीला प्राधान्य दिले पाहिजे, असे मच्छीमारांनी सांगितले.