महिलांना बलात्काराच्या खोट्या तक्रारी करायला लावू नका!

woman

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महिलांना बलात्काराच्या खोटय़ा तक्रारी करायला लावू नका, अशी ताकीद दिल्लीतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अरुण ग्रोव्हर बालिगा यांनी महिलांच्या हक्क अधिकारांसाठी कार्यरत असणाऱ्या संघटनांना दिली आहे.

एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी कथित पीडितेने न्यायालयात जबाब देताना आपल्या तक्रारीतील बलात्काराचा आरोप आपण सरोजिनी नगर पोलीस ठाण्यातील एका ‘एनजीओ’च्या समुपदेशकाच्या सल्ल्यावरून केला, असे सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला २२ दिवस कोठडीत काढावे लागले.

समुपदेशकांना प्रशिक्षण द्या
दिल्लीत महिला आयोगाने प्रत्येक पोलीस ठाण्यात अन्याय-अत्याचारांच्या प्रकरणात महिलांच्या मदतीसाठी ‘एनजीओ’ महिला कार्यकर्त्यांना ‘समुपदेशक’ म्हणून नेमलेले आहे. त्यांना त्यांची कर्तव्ये समजावून सांगून योग्य ते प्रशिक्षण द्यावे. समुपदेशकांनी त्रस्त-पीडित महिलांना मदत, पाठबळ द्यावे. त्यांना बलात्काराच्या खोट्या तक्रारी दाखल करण्यास भरीस पाडू नये, असे निर्देश सत्र न्यायाधीश अरुण ग्रोव्हर बालिगा यांनी महिला आयोगाला दिले.