उरणकरांनो जमिनी विकू नका ; शिवसेनेचे आवाहन

राजकुमार भगत । न्हावाशेवा

एमएमआरडीएचा विरार अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार असून या कॉरिडॉरच्या लगतची जमिन घेण्यासाठी भू-माफिया सरसावले असून त्यांचे हस्तक एजंट सध्या अशी जमिन स्वस्तात लाटून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरी हेलपाटे घालत असल्याचे चित्र उरण तालुक्यात पहायला मिळत आहे. अशा एजंटांच्या भूलथापाना बळी पडू नका असे आवाहन उरण तालुका शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी पत्रक काढून असे आवाहन केले आहे.

विरार-अलिबाग कॉरीडॉरचा विरार (नवघर) ते चिरनेर  ७९ कि.मीच्या सुमारे १० हजार कोटी रूपयांच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील चिरनेर, विंधणे, चिखली भोम, भोम, कळंबुसरे या गावातील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. यासाठी लवकरच भूसंपादनाची प्रक्रीया सुरू होणार आहे. या मल्टीमॉडल कॉरॉडॉरमुळे येथील जमिनींना सोन्याचा भाव मिळणार आहे. मात्र त्यापूर्वीच भांडवलदार आणि भूमाफियांची या सोन्याच्या जमिनीवर नजर गेली असून आपल्या हस्तकांना स्वस्तामध्ये या जमिनी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी नेमले आहेत. असे एजंट सध्या गावोगावी फिरत असून शेतकऱ्यांना भूलथापा दाखवून या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत आहेत.

विरार ते अलिबाग असा १२६ किलोमिटरचा हा मार्ग असणार आहे. यामध्ये एनएच-८, भिवंडी बायपास, एनएच-३, एनएच-४, एनएच-४ ब, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, एनएच-१७ इत्यादी मार्गांना हा रस्ता जोडला जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ, न्हावा-शिवडी सिलिंक या सारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे उरण परिसराला कमालिचे महत्व आले आहे. त्यामुळे अगोदरच काही भूमाफियांनी येथिल जमिनी स्वस्तात बळकावल्या आहेत. आत्ता या कॉरिडॉरचे काम दृष्टीक्षेपात आल्या नंतर परत एकदा या जमिनींवर या भू माफियांचा डोळा लागला आहे. सध्या हे एजंट शेतकऱ्यांना गुंठ्यामागे दोन लाख किंवा एकरी ८० लाख ते १ कोटी रूपये भाव देवून गंडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भूसंपादनानंतर या जागेला पाच ते दहापट भाव मिळण्याची शक्यता आहे. शिवाय सध्या शासन सुद्धा शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला मोबदला देत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी मार्गालगतच्या जमिनी ज्या प्रकारे धनदांडग्यांनी आणि खरेदी केल्या असल्याचे ज्या प्रकारे उघड झाले होते तसा प्रकार इथे होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गासाठी ज्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्यांना देखील कोट्यावधी रूपये मोबदला मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी असल्या फसव्या एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. या जमिनींना नंतर चांगला भाव मिळणार असून शेतकऱ्यांनी सावध रहावे असे एमएमआरडीएच्या सुत्रांकडूनबी शेतकऱ्यांना सुचित करण्यात आले आहे.