सावधान! एटीएम ग्राहकांना ५१ हजारांचा गंडा

सामना प्रतिनिधी । मालवण

बँकेतुन बोलतोय असे सांगत एटीएमचा नंबर घेऊन एटीएम ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. अशाच पद्धतीने ५१ हजार रुपयाची फसवणुक झाल्याचा प्रकार मालवण तालुक्यातील दोघा एटीएम ग्राहकांच्या बाबतीत घडला आहे. याबाबत, मालवण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

कट्टा येथील मधुकर रघुनाथ वराडकर यांना ५ जुलै रोजी तर देवली येथील समीर सत्यवान आळवे यांना ७ जुलै रोजी बँकेतुन बोलतोय असे सांगत एक निनावी फोन आला. एटीएम कार्डवरील १६ अंकी नंबर त्यावेळी घेण्यात आले. त्यानंतर वराडकर यांच्या बँक खात्यातुन १६ हजार तर आळवे यांच्या खात्यातुन ३५ हजार रक्कम काढण्यात आली. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बँकेशी संपर्क साधला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर दोघांनीही मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी तक्रारदारांना सुचित करताना यापुढे अशा फसवणुकीच्या प्रकारांना बळी न पडता बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.