साईबाबांच्या पादुकांचे दौरे त्वरित बंद करा, ग्रामस्थांची संस्थानकडे मागणी

सामना ऑनलाईन । शिर्डी

प्रचार आणि प्रसाराच्या नावाखाली सुरू असलेले साईबाबांच्या पादुकांचे दौरे त्वरित बंद करावेत, अशी मागणी आज शिर्डीतील ग्रामस्थांनी संस्थानचे विश्वस्त आणि अधिकाऱ्यांकडे केली आहे. येत्या ५ नोव्हेंबरला साईबाबांच्या पादुकांचा चेन्नई दौरा आयोजित करण्यात आला आहे. हा दौरा रद्द न केल्यास ‘छत्रपती शासन’चे सुमारे १५० तरुण उपोषणाला बसतील, असा इशारा गणेश कोते व वैभव कोते यांनी दिला आहे.

शताब्दी महोत्सवानिमित्त बाबांचा प्रचार आणि प्रसार करावा असा व्यवस्थापनाचा हेतू असल्याचे संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मागणीबाबत व्यवस्थापनाच्या बैठकीत चर्चा करण्याची ग्वाही कदम यांनी दिली. संस्थानच्या उपसमितीच्या बैठकीत ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडली.

माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी ग्रामस्थ व विश्वस्त यांच्या चर्चा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्षा योगीता शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, सर्जेराव कोते, प्रमोद गोंदकर, सचिन शिंदे, नीलेश कोते, राजेंद्र भुजबळ, अमोल गायके, तुकाराम गोंदकर, दत्तात्रय आसने, गणेश कोते आदी उपस्थित होते.

बाबांची कोणतीही वस्तू शिर्डीबाहेर नेऊ नये. त्याऐवजी येथे येणाऱ्या भाविकांसाठी वर्षभर पादुका व बाबांच्या शेवटच्या स्नानाचा पलंग दर्शनासाठी उपलब्ध करून द्यावा. प्रथम प्राथमिक गरजा पूर्ण करून येथे येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त चांगले दर्शन व सुविधा देता येईल. त्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

भावनेच्या आडून स्वार्थ साधला जातोय
पादुकांच्या माध्यमातून बाजार मांडला जातोय, भावनेच्या आडून व्यवहार साधला जातोय, दौरे केले जाताहेत असा आरोप करत साईबाबांचा प्रचार आणि प्रसार करायचा होता तर टीव्ही, पेपरमधून शताब्दीची जाहिरात का करण्यात आली नाही, शिर्डीत शताब्दीत येणाऱया भाविकांच्या स्वागताचा एकही फलक का लावला नाही, असे सवाल करत ग्रामस्थांनी पादुका दौऱयाच्या हेतूवरच संशय व्यक्त केला.