लग्नाला विलंब होतो आहे?… मग हे वाचा

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

एकदा शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागली की पालक मुलांसाठी स्थळ शोधायला सुरुवात करतात. काही व्यक्तींची कुंडली ह्या बाबतीत एवढी चांगली असते की स्थळ पाहायला सुरुवात केली आणि लग्न जमले!! परंतु काही व्यक्तींच्या कुंडलीत उशिरा विवाहाचे योग असल्याने त्यांना बऱ्याच प्रयत्नांती यश येते. ह्यावरच आजचा लेख –

१) अमितच्या लग्नाच्या योगाबाबत मला त्याच्या आईवडिलांनी २०१५ च्या दरम्यान कुंडली दाखवली होती. कुंडलीत सुरू असलेली महादशा, गुरु सारख्या ग्रहांचे भ्रमण आणि संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करून त्यांना तुमच्या मुलाचे लग्नाचे योग २०१७ सप्टेंबरनंतर आहेत असे सांगितले परंतु त्यांना ते कदाचित अपेक्षित नव्हते. त्यांचे म्हणणे,”एवढ्या उशिरा कसं लग्न होऊ शकतं? तोपर्यंत तर अमित २९ वर्षांचा होईल. मग मनासारखी मुलगी जीवनसाथी म्हणून लाभणार नाही. तुम्ही त्या आधी लग्नाचे योग आहेत का ते तपासून पुन्हा सांगा आणि लवकर लग्न होण्यासाठी काही रत्न किंवा शांती असेल तर ती सुद्धा सुचवा.” त्यावर त्यांना माझे उत्तर असे होते,” लग्नाचे योग तर २०१७ चे दिसत आहेत. तुम्ही योग्य मुलगी शोधण्याचे प्रयत्न मात्र आता पासूनच करायला हवेत. मुलगी तर मनपसंतच असणार आहे. त्यासाठी कुठल्याही रत्नाची किंवा शांती करून घेण्याची गरज नाही.” त्यानंतर मधल्या काळात आमचे बोलणे होत होते. आलेली स्थळे आणि पसंत -नापसंत ह्या गोष्टींची माहिती ते मला देत होते. २०१५ आणि २०१६ असेच निघून गेले आता मात्र अमितच्या आई वडिलांना टेंशन आले. बोलण्यातून त्यांना पुन्हा धीर दिला. २०१७च्या मार्चमध्ये अमितला एक स्थळ पसंत असल्याची माहिती मिळाली. सगळी बोलणी होऊन एप्रिल महिन्यात अमितचा साखरपुडा झाला आणि त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नही झाले.

२०१५ च्या फेब्रुवारी महिन्यांत जेंव्हा हीच गोष्ट अमितच्या आई -वडिलांना सांगितली तेंव्हा त्यांना ते अशक्य वाटले. किंबहुना त्यांना लग्न २०१५ किंवा २०१६ मध्ये होईल ह्यांबाबत खात्री होती. परंतु Destinyने ठरवल्याप्रमाणे लग्न २०१७लाच झाले.
२) अमितसारखीच अजून एक कुंडली मानसीची (नाव बदलेले आहे ) वयाच्या २१-२२ व्या वर्षापासूनच लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. योग्य वर शोधण्याचा अथक प्रयत्नांना काही यश येत नव्हते. कुठे मुलगा पसंत होता परंतु कुंडली जुळत नाही. कुठे कुंडली छान जुळते परंतु मुलाचा पगार योग्य नाही. सगळं छान आहे परंतु मुलगा पायाने अधू आहे. असं काहीसं असतांनासुद्धा मानसीने लग्न करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु काही कारणामुळे ते फिस्कटले. मानसी मात्र अत्यंत आशावादी होती. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी तिला समोरून लग्नाची मागणी आली. योग्य वर, निर्व्यसनी, स्वतःचा व्यवसाय,सांपत्तिक स्थिती उत्तम, परदेशात राहणारा. सर्व योग्य होते. लग्न झाले आणि आज संसाराला १३ वर्ष पूर्ण झाली. मानसीचा संसार अगदी छान सुरु आहे.

वयाच्या २८-२९व्या वर्षी लग्न होणे म्हणजे आजच्या पिढीसाठी उशिरा लग्न होणे नव्हे. कारण शिक्षण पूर्ण होऊन, नोकरी आणि पुन्हा उच्च शिक्षण पूर्ण करून सिथरस्थावर होईपर्यंत २८-२९ वय होतेच.परंतु वयाने तिशी ओलांडली की मग उशीर होतोय असं वाटायला लागतं.

लग्न उशिरा होणं असं दिसून येतं का कुंडलीत हा प्रश्न मला सर्रास विचारला जातो. त्याच उत्तर हो असं आहे. कुंडलीत असणारे काही योग, ग्रहांच्या परिणामामुळे, महादशेमुळे लग्न योग्य वयांत न होणं असं होऊ शकतं.

१) कुंडलीतील सप्तम स्थानावरून वैवाहिक जीवनाबद्दल कल्पना येते. ह्या सप्तम स्थान जर शनिची मकर किंवा कुंभ राशी असेल तर विवाह होण्यास विलंब होतो.

२) सप्तम स्थानात स्वतः शनि असेल तर विवाह २८ वर्षाच्या आधी होऊ शकत नाही. काही ना काही लग्न कारणाने लांबणीवर जाते.

३) सप्तम स्थानाच्या अधिपतीवर शनिची दृष्टी असणं किंवा सप्तम स्थानाचा अधिपती योग्य स्थानात नसणं.

४) चंद्र हा मनाचा कारक आहे. कुठल्याही व्यक्तीचा स्वभाव त्याच्या चंद्र राशीवरून सांगता येणं सहज शक्य आहे. अशा ह्या चंद्रावर शनिची दृष्टी असता विवाह लवकर होत नाही.

५) कुंडलीवरून होत असलेल्या सद्य ग्रहांच्या भ्रमणावरही विवाह कधी होणार हे अवलंबून आहे. गुरुचे भ्रमण हे विवाह होण्यासाठी उपयुक्त ठरते.

६) सर्वात शेवटी कुंडलीला सुरू असलेली महादशा, अंतर्दशा ह्यांवरून लग्नाचे योग कधी हे सांगता येऊ शकतं. जर दशा Positive असतील तर लग्न होण्यास अडथळे येत नाहीत.
सप्तम, लाभ, पंचम, द्वितीय, तृतीय स्थानाशी निगडीत जर दशा असतील तर विवाह लवकर होतो.

विवाहाला विलंब होत असेल तर पालकांना टेंशन येतं परंतु सर्व पालकांना माझे हे सांगणे आहे की विवाह उशिरा होणे, लवकर होणे ह्या पेक्षा सध्याच्या घडीला तो विवाह टिकवणे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य जीवनसाथी मिळण्यासाठी विलंब होऊ शकतो. सध्याच्या पिढीच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या जशा अपेक्षा आहेत तशा समोरच्या व्यक्तीच्याही अपेक्षा आहेत. घाईने विवाह आणि घाईने काडीमोड ह्यापेक्षा विलंबाने विवाह परंतु सुखी संसार ह्यांपैकी कशाची निवड करायची ते तुम्हीच ठरवा.

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा: [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)

  • Mast lekh…aajkal ushira vivah hotat pan anupriya ni sangitlya pramane ushira jari zal tari jodidar chi niwad mahatwachi tyasathi wel lagla tari chalel..