पालिकेच्या आपत्कालीन विभागाने केली पोलखोल, हवामान खात्याचे रडार बंद

सामना प्रतिनिधी, मुंबई

हवामानाचे अंदाज चुकविण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या हवामान खात्याचे डॉप्लर रडार मान्सूनच्या काळात अनेकदा बंद होते अशी वस्तुस्थिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने मांडली आहे. तसेच याबाबत हवामान खात्याने उचित कार्यवाही करावी अशीही शिफारस आपत्कालीन विभागाने केली आहे.

हवामान खात्याचे चुकणारे अंदाज हा सर्वसामान्यांसाठी नेहमीच थट्टेचा विषय असतो. ३० ऑगस्टलाही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे सरकारी कार्यालयांना सुट्टी दिली होती, मात्र तो अंदाज चुकल्यामुळे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. आता पालिकेच्या आपत्कालीन विभागाने हवामान खात्याचीच पोलखोल केली आहे. २९ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईत जागोजागी पाणी भरले आणि पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागला. या अतिवृष्टीचा पालिकेच्या आपत्कालीन विभागाने अभ्यास केला आहे. रेल्वे, हवामान खाते, वाहतूक पोलीस, बेस्ट परिवहन आणि विद्युत विभाग, रिलायन्स एनर्जी या सर्व सेवांनी या काळात काय कामगिरी केली, कोणत्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून विभागाने एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात हवामान खात्याबरोबरच सर्वच प्राधिकरणांच्या त्रुटींवर बोट ठेवले आहे व शिफारसी करण्यात आल्या आहेत. हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

मुंबईसाठी वेगळा हवामान अंदाज हवा
पालिकेचा आपत्कालीन कक्ष मुंबईतील सर्व प्राधिकरणांचे नेतृत्व करतो. पालिका आयुक्त हे त्याचे प्रमुख असतात. आणीबाणीच्या परिस्थितीत रेल्वे, हवामान खाते, वाहतूक पोलीस, बेस्ट परिवहन आणि विद्युत विभाग, रिलायन्स एनर्जी अशी सर्व प्राधिकरणे पालिकेच्या आपत्कालीन विभागाअंतर्गत येतात. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सर्व विभागांना ऍलर्ट केले जाते. मात्र हवामान खात्याचे रडारच अनेकदा बंद होते असे या आढळून आले आहे. हवामान खात्याचे अंदाज हे कोकण, पालघर, ठाणे मुंबई यांसाठी एकत्रित दिले जातात. त्यापेक्षा यापुढे मुंबईसाठी वेगळा हवामान अंदाज वर्तविला जावा अशीही शिफारस करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीच्या वेळी हवामान खात्याचा प्रतिनिधी आपत्कालीन कक्षात उपस्थित असावा, असेही या अहवालात म्हटले आहे.

मध्य रेल्वेची मुजोरी
मध्य रेल्वेच्या मुजोरीवरही आपत्कालीन विभागाने बोट ठेवले आहे. गाडय़ांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आपत्कालीन विभागाने रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला हॉटलाइनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यावरून कोणताही प्रतिसाद दिला जात नव्हता. मध्येच लोकलगाडय़ा थांबल्यामुळे प्रवासी अडकल्यास त्यांना सोडवण्याची व्यवस्था रेल्वेनेच केली पाहिजे अशीही शिफारस यात आहे.