दुहेरीतील खेळाडू नेहमीच दुर्लक्षित – अश्विनी पोनप्पा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

हिंदुस्थानातील दुहेरीतील बॅडमिंटनपटूंना नेहमीच सापत्न वागणूक मिळत असल्याबद्दल देशाची दुहेरीतील स्टार खेळाडू अश्विनी पोनप्पा हिने नाराजी व्यक्त केली. सातत्याने खंत व्यक्त करूनही आम्ही दुहेरीतील बॅडमिंटनपटू नेहमीच दुर्लक्षित राहतो, असे ती म्हणाली. ज्वाला गुट्टाच्या साथीने २०११ मध्ये जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदक पटकाविणारी अश्विनी पोनप्पा म्हणाली, बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानी खेळाडू नक्कीच सुरेख कामगिरी करत आहेत, मात्र दुहेरीतील खेळाडूंसाठी आपल्याकडे प्रतिकूल परिस्थिती आहे. दुहेरीतील खेळाडूंना चांगली कामगिरी केल्यानंतरही प्रायोजक मिळत नाही. त्यांना चांगले प्रशिक्षक मिळण्यासाठी फारसे प्रयत्नही होत नाहीत. त्यामुळे युवा खेळाडू दुहेरीऐवजी एकेरी खेळाकडे वळतात. ज्युनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीतील विजेत्याला कार मिळते, तर दुहेरीतील विजेता मात्र दुर्लक्षित राहतो. चीन, कोरिया आणि जपानसारख्या देशांमध्ये दुहेरीतील खेळाडूंनाही तितकेच महत्त्व मिळते. आपल्याकडे मात्र सापत्न वागणुकीमुळे खेळाडू दुहेरीकडे वळायला तयार नाहीत हे वास्तव आहे, असेही अश्विनीने सांगितले.