ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांना समाजक्रांती पुरस्कार प्रदान

1

सामना प्रतिनिधी । राहुरी

हिंदु धर्माच्या नावावर आज सुरू असलेला प्रचार हा मुख्य भौतिक प्रश्नाला बगल देणारा आसुन तो सुशिक्षित लोकांना देखील पटतो. हे दुर्दैवी असल्याची टीका खासदार कुमार केतकर यांनी केली.  राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे शनिवारी आयोजित केलेल्या स्वतंत्र सेनानी पी.बी.कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपुरचे माजी आमदार दौलतराव पवार होते. यंदाचा समाजक्रांती पुरस्कार विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे यांना कुमार केतकर, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, दौलतराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

केतकर पुढे म्हणाले धर्म  व परंपरा यांच्यात थोतांड चालले आसुन धर्माच्या नावावर सुरू असलेला प्रचार हा अतिशय धोकादायक आहे. मोदी सरकारच्या कार्यपद्धती विरूध्द कुमार केतकर यांनी जोरदार टीका केली.

विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे म्हणाले मुलींना शिकवणे पाप असून धर्म बुडेल असे पुर्वी सांगितले जायचे मात्र सावित्रीबाई फुले यांनी संघर्ष करीत मुलींना शिक्षण दिल्याने आज महिला सन्मानाने जगत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईलचा वापराचा अतिरेक वाढत चालचा आहे. मात्र या मधून जे चांगले मिळते तेच घ्या असा सल्ला देत राहुरी तालुक्यातुन समाजक्रांती पुरस्कार मिळाल्या बद्दल भारावून गेल्याचे साळुंखे म्हणाले.

यावेळी रयत शिक्षण संस्थेत उत्कृष्ट  कामगिरी करणार्‍या शिक्षकांना शांताबाई कडू स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या समारंभास नगरचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर,आमदार सुधीर तांबे, संजय नागपूरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, विजय बनकर, आण्णासाहेब थोरात, अर्जुनराव राजळे, एकनाथ घोगरे उपस्थित होते.