डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 100 फुटांनी वाढवली

सामना प्रतिनिधी । मुंबई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादरच्या इंदू मीलमध्ये भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या नियोजित स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 100 फूटांनी वाढवून 450 फूट करण्यास मान्यता देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर स्मारकाच्या कामाची सविस्तर माहिती दिली. विरोधकांना ते उद्देशून म्हणाले की, ज्या महामानवाने संविधान दिले, त्या महामानवासाठी यापूर्वीच्या सरकारने एक इंचही जमीन दिली नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सर्व परवानग्या आणल्या. सीआरझेडपासून सर्व मंजुरी आणली. कामाला सुरुवातही झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मॉडेलही तयार असून स्मारकाचे काम 6 डिसेंबर 2020पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पुतळ्याची उंची 450 फूट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पुतळ्याची उंची 350 फूटांवरून 450 फूट करण्याची मागणी करण्यात आली होती. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 450 फूट करण्यास आठ दिवसांपूर्वी मान्यता दिली आहे. त्यामुळे डिझाईनमध्येही बदल झाला व त्यालाही मान्यता दिली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिवस्मारकाचे प्राथमिक काम सुरू

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याच्या दृष्टीकोनातून 70 ते 80  कोटी रुपयांचे प्राथमिक काम झाले आहे. मात्र, उच्च न्यायालयात या अनुषंगाने याचिका दाखल झाली होती. त्यात शासनाच्या बाजूने निकाल लागला असून आता सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात तारीख आहे. यावेळी देशाचे ऍटर्नी जनरल राज्य शासनाची बाजू मांडणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या