जगज्जेता सायकलपटू

जयेंद्र लोंढे,[email protected]

डॉ. अमित समर्थ. आयर्न मॅन. रशियातील 9100 कि.मी.ची प्रतिष्ठेची सायकल शर्यत 25 दिवसांत, 279 तासांत जिंकली… आणि केवळ हिंदुस्थानातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिला खेळाडू ठरला आहे.

महाराष्ट्राच्या 38 वर्षीय डॉ. अमित समर्थ याने रशिया येथे सातासमुद्रापार झालेली रेड बुल ट्रान्ससैबेरियन एक्स्ट्रीम ही 9100 कि.मी.ची प्रतिष्ठेची सायकल शर्यत पूर्ण करीत हिंदुस्थानचा झेंडा रुबाबात फडकवला. 25 दिवसांत 379 तासांमध्ये 15 विविध टप्पे पूर्ण करीत शर्यतीत बाजी मारणारा तो हिंदुस्थानातीलच नव्हे, आशिया खंडातील पहिला खेळाडू ठरला. आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत 13 वेळा ‘आयर्न मॅन’चा (एकाच वेळी रनिंग, स्विमिंग, सायकलिंग पूर्ण करणे) किताब जिंकणाऱया या पठ्ठय़ाला आता स्पोर्टस् ऍकॅडमी सुरू करायचीय. त्यामधून हिंदुस्थानची युवा पिढी घडवण्याचे स्वप्न त्याने पाहिलेय.

जिद्दीच्या जोरावरच यशस्वी

रशियातील सायकलिंग शर्यत पूर्ण करताना अमित समर्थला प्रत्येक टप्प्यावर खडतर आव्हानाला सामोरे जावे लागले. मात्र जिद्द व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मी यशस्वी ठरलो असे यावेळी तो म्हणाला. रशियामध्ये तापमानात चढ-उतार असायचा. एवढेच नव्हे तर टेकडय़ांवरूही सायकल चालवावी लागली. ही सर्व आव्हाने त्याने लीलया परतवून लावली.

आठ महिन्यांचा कसून सराव

रशियातील आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीत यशस्वी होण्यासाठी अमित समर्थ याने सर्वस्व पणाला लावले. आठ महिने आधीपासून त्याने कसून सराव केला. डॉक्टर असल्यामुळे त्याला क्लिनिकला वेळ द्यावा लागत असे. अशा वेळी त्याने वीकेण्डला (शनिवार/रविवार) जास्त सराव केला. 600 ते 700 कि.मी. सायकल चालवून तो आपल्यामधील क्षमता ओळखत असे. सोमवार ते शुक्रवार तो थोडा कमी सराव करीत असे.

स्पोर्टस् ऍकॅडमी बनवायचीय…

गेल्या आठ वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा दिमाखात फडकवणाऱया अमित समर्थ याला स्पोर्टस् ऍकॅडमीची स्थापना करायचीय. भविष्यात ही ऍकॅडमी उभी करण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे. नागपूरमधील काही व्यक्ती यासाठी त्याला मदत करणार आहेत. या ऍकॅडमीत आयर्न मॅन, ट्रायथलॉन, लांब पल्ल्याचे धावपटू, अल्ट्रा रनर, ऍथलेटिक्स या सर्वांचा समावेश असणार आहे. यामधून हिंदुस्थानच्या युवा पिढीला योग्य दिशेने नेण्याचे काम तो करणार आहे.

13 वेळा प्रतिष्ठेचा किताब जिंकलाय

अमेरिकेत पब्लिक हेल्थ या विषयात मास्टर झालेल्या अमित समर्थ याला फिटनेसबाबत गोडी लागल्यानंतर त्याची पावले ‘आयर्न मॅन’ या किताबाकडे वळली. 2011 सालापासून सुरू झालेल्या प्रवासाने आठ वर्षांमध्ये उत्तुंग शिखर गाठलेय. तो तब्बल 13 वेळा ‘आयर्न मॅन’ ठरलाय ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.

व्हिडीओ पाहून प्रेरणा मिळाली

अमित समर्थची गेल्या काही वर्षांमधील रनिंग, स्विमिंग व सायकलिंग या तीन प्रकारांतील देदीप्यमान कामगिरी देशातील युवकांसाठी प्रेरणा ठरलीय. यावेळी अमित समर्थ कोणाला पाहून ‘आयर्न मॅन’साठी सरसावला? असा प्रश्न तमाम क्रीडाप्रेमींना पडलाय. यावर तो म्हणाला, यू टय़ूबवरील या खेळातील व्हिडीओ पाहून प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी यामध्येच पुढे जाण्याचा निश्चय केला.

दररोज 15 ते 20 कि.मी. सायकल चालवतो

अमित समर्थ हा फिटनेस वेडा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. स्पर्धा असो किंवा नसो, तो दररोज 15 ते 20 किलोमीटर सायकल चालवतो. यावेळी शरीराच्या दृष्टीने सायकल चालवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तो आवर्जून सांगतो. नागपूरमध्ये अमित समर्थ आई, वडील, पत्नी व मुलासोबत वास्तव्य करीत आहे.