हिंदुस्थानातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी याचे अलिबागशी होते दृढ नाते

6

सामना प्रतिनिधी । अलिबाग

हिंदुस्थानातील पहिल्या महिला डॉक्टर बनण्याचा मान जातो तो डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्याकडे. कर्मठ काळात पतीच्या सहकार्याने आनंदीबाई जोशी यांनी समाजातील लोकांच्या तीव्र भावना झिडकारून त्यांनी आपले ध्येय साध्य केले. आनंदीबाई गोपाळ जोशी या काही काळ जिल्ह्यातील अलिबाग शहरात वास्तव्यास राहिल्या होत्या. त्यामुळे अलिबागकरांना याचा अभिमान आहे. आज त्यांच्या जीवन चरित्रावर आनंदीबाई जोशी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने अलिबाग वास्तव्याचा घेतलेला हा आढावा.

1883 चा काळ, अलिबागला 5000 ची लोकसंख्या त्याकाळी होती. त्याकाळी वीज नव्हती. गावचा खोत रस्त्यावरच्या पोलवर रॉकेलचा कंदील पेटवत असे. शांत समुद्रकिनारी वसलेले हे अलिबाग गाव. अलिबाग गावात गोपाळ जोशी यांनी पोस्ट कार्यालयात बदली करून घेतली होती. त्यामुळे आनंदीबाई ह्या आपल्या पतीसह अलिबागमध्ये वास्तव्यास आल्या होत्या. गोपाळ जोशी हे पोस्ट कार्यालयात कारकून म्हणून काम करीत होते.

अलिबागमध्ये त्याकाळी गावातील मयेकर वाडी येथे पोस्ट कार्यालय होते. त्याकाळी मयेकर वाडी गल्ली ही पोस्टाची गल्ली म्हणून ओळखली जायची. तर जोशी कुटूंब हे कर्वे रोड वरील प्राचार्य ए. व्ही. कुलकर्णी यांच्या घरात राहत होते. गोपाळ जोशी व आनंदी बाई जोशी ज्या ठिकाणी राहत होते त्याठिकाणी आज प्यारेलाल जैन याची इमारत झाली आहे.

आनंदीबाई म्हणजे कल्याणच्या गणपतराव जोशी यांची कन्या यमुना. ३१ मार्च १८६५ या दिवशी तिचा जन्म झाला. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याकारणाने त्यांचे बालपण फारसे रम्य नव्हतेच. आनंदीचे लग्न लवकर करून मोकळे व्हावे असाच विचार तिच्या आई-वडिलांचा होता. अशातच पोस्टात काम करणाऱ्या गोपाळराव जोशींचे स्थळ अनायसे चालून आले व त्यांच्याशी यमुनाचे लग्न करण्याचे गणपतरावांनी पक्के केले. गोपाळराव जोशी हे विदुर होते व सुधारक विचारांनी भारावलेले होते. विधवेशी पुनर्विवाह करण्याचा त्यांनी निश्चय केला होता. आपल्यापेक्षा वयाने २० वर्षांनी लहान असलेल्या कुमारिकेशी विवाह करणे त्यांना पटत नव्हते. त्यांनी लग्न ठरू नये म्हणून खूप प्रयत्न केले. अखेर यमुनाला शिकण्यासाठी तिच्या माहेरून काही विरोध नसावा अशी अट मान्य केल्यावरच ते लग्नास तयार झाले.

स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे हा त्यांचा ध्यास होता व त्याची सुरुवात स्वतःच्या कुटुंबातून करण्याचा त्यांचा मनोदय होता. आनंदीला शिक्षणात फारसा रस नव्हता, परंतु पतीच्या नजरेच्या धाकाने तिला अभ्यास करावा लागत असे. सुधारक विचारांचा काहीसा विक्षिप्त व मनस्वी अशा पतीमुळे तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली. सर्वसामान्य मुलींप्रमाणे केवळ संसार तिने करू नये तर शिक्षण घेऊन काही तरी वेगळे करावे, असे गोपालरावांना वाटत असे. तिच्या आईला शिक्षणाचे महत्व मुळीच समजले नसल्याने ती मात्र आनंदीचा अतिशय राग-राग करीत असे. तिच्या मागे कामांचा सपाटा लावून तिला अभ्यासाला वेळच देत नसे. तरीही तिने अभ्यास केला नाही तर पतीचा मार खायचा व केला तर आईचा मार खायचा, असे घोर संकट आनंदीबाई वयाच्या १० – १२ व्या वर्षी झेलत होत्या. एकदा आईने जळक्या लाकडाने दिलेल्या माराने शरीरावर झालेल्या जखमा गोपाळरावांचे निदर्शनास आले व या घरात राहुन तिचा अभ्यास होणार नाही, या विचाराने त्यांनी आपली बदली अलीबाग येथे करवून घेतली.

अलिबागमध्ये आनंदीबाईच्या अभ्यासाला गती आली. तिचे भाषेचे ज्ञान वाढावे म्हणून मराठी बरोबरच संस्कृत भाषेचे शिक्षण त्यांनी सुरु केले. आपल्या पतीवरील विश्वास व त्यांची कार्यावरील निष्ठा यामुळे आनंदीबाईनी हे शिक्षणाचे व्रत स्वीकारले व त्या दोघांमध्ये पती-पत्नी पेक्षा गुरु-शिष्याचे नाते अधिक दृढ झाले.

आनंदीबाई जोशी यांचे पाय अलिबागच्या मातीला लागल्याने हा अलिबागचा बहुमान असून लिबागकरांना अभिमान आहे. आनंदीबाई जोशी ह्या अलिबाग सारख्या गावात राहिल्या होत्या याबाबत तरुण पिढीला कोणतीही कल्पना नाही. मात्र आनंदीबाई जोशी यांच्या जीवनचरित्रपट सिनेमामुळे पुन्हा एकदा अलिबागचा उल्लेख यानिमित्ताने होईल यामुळे घेतलेला हा आढावा.