मुद्दा – अंधश्रद्धा निर्मूलन : आक्षेप व अपेक्षा

>>डॉ. अनिल कुलकर्णी<<

सनातनी विचारांविरुद्ध बंडखोरी जुन्या काळातही होती. गौतम बुद्धांच्या मते ईश्वर आहे की नाही या वादापेक्षा माणसाचे दुःख जाणणे महत्त्वाचे. परंपरा तपासून घेतलेल्या नसतात. एकाने दुसऱ्याला सांगितलेल्या असतात. चिकित्सा न केलेले ज्ञान स्वीकारणे योग्य नाही. खिळे मारल्यासारखे संस्कार घट्ट रुतणार नाहीत. संस्कार रुजवायला हवेत, बहरायला हवेत. बहरण्याची क्रिया सुगंध देते, आसमंत दरवळून टाकते.

आपली बुद्धी दुसऱ्याकडे गहाण न टाकता अंधश्रद्धा घालवता येतील का? अंधविश्वासाची जळमटं मेंदूतून साफ केली पाहिजेत हा विचार कितीजणांना रुचेल? अंधश्रद्धा निर्मूलनाची फलनिष्पती ‘Disease is not Curable, but Death is Painless’  ही आहे. निर्मूलन झाले नाही तरी जागृती ही खूप महत्त्वाची असते. ती जाणीव देते व जाणीव जीवन सुसह्य करते. विकासात परमेश्वराला स्थान आहे की विज्ञानाला? अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमामुळे मानसिकता बदलत आहे. पशुहत्या कमी होत आहे. बुवा उघडे पडत आहेत. चमत्कारामागचे विज्ञान कळत आहे. तरीही चमत्कार, बुवाबाजी, भूत-भानामती, फलज्योतिष, पशुहत्या, जटा येणे याविरुद्ध सतत आवाज उठवणे सोपे नाही. लोक ऐकत नसताना पटवणं अवघड आहे. कायम स्वरूपाचे अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही हा एक आक्षेप आहे. गरिबी हटावमुळे गरिबी हटली काय, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. तो खराही आहे. पण म्हणून प्रयत्न करायचे नाहीत का?

अंनिसचा निक्रिय कार्यकर्ता म्हणून टीका करणे सोपे आहे. सक्रिय होऊन पहा, बोलून पहा, करून पहा, उद्दिष्टे विशिष्ट चौकटीतच बंदिस्त केली की कार्यालाही मर्यादा पडतात आणि ती चौकट संदिग्ध आखली की, वैचारिक भूमिकेविषयी प्रश्न उद्भवतात हा एक आक्षेप आहे. कुठेतरी थांबण्यासाठी, निश्चित ठरविण्यासाठी चौकट, सीमारेषा आवश्यक असते. उद्दिष्टे संदिग्ध असली की, वैचारिक भूमिकेविषयी प्रश्न पडतात, चौकटीमुळे नव्हे. एकाच संघटनेत भिन्न विचारांमुळे संभ्रम निर्माण होतो. कार्यकर्त्यांना न दुखावता अंधश्रद्धा निर्मूलन करायचे असल्यामुळे कार्यकर्त्यांबद्दल कठोर भूमिका घेता येत नाही. समाजाची मानसिकता हळूहळू बदलते. समाज उत्सवप्रिय असतो. अशा परिस्थितीत कोणकोणती धार्मिक कृत्ये करावीत, आपापल्या दैवतांची उपासना कशी करावी हा त्या त्या व्यक्तीचा प्रश्न. समाधानासाठी माणसं काहीही करतात. सत्यनारायणाच्या पूजेच्या कथेबद्दल बोललेले आजही आपल्या समाजाला आवडत नाही. कथेत प्रलोभन व भीती यांचा वापर करण्यात आला आहे असा आक्षेप काहींचा आहे. संत गाडगे महाराज हजारोंच्या समुदायासमोर या कथेचा पंचनामा करत.

घरी सत्यनारायण, धार्मिक विधी करून अंधश्रद्धा निर्मूलन करणारेही आहेत. देव, धर्म, उत्सव यामुळे समाजामध्ये थोडे चैतन्यही आहे, मात्र त्याचे अवडंबर नको हेदेखील खरेच.

अंधश्रद्धांना विरोध म्हणजे शोषण, अनिष्ट प्रथा, रूढी, कालविसंगत कर्मकांड, त्यातून होणारी दिशाभूल, फसवणूक याला विरोध. श्रद्धेचा फायदा घेऊन अंधश्रद्धा रुजवली जाते. लोक अंधश्रद्ध बनतात ती त्यांची गरज असते. काही अंधश्रद्धा नष्ट व्हायलाच हव्यात. समाजाला मागे नेणाऱ्या अंधश्रद्धा संपायलाच हव्यात.