डॉ. बी. एम. धात्रक

>> राजेश पोवळे

वैद्यकीय व्यवसाय हा सेवाधर्म आहे आणि या धर्माला जागून रुग्णांची सेवा करणारे रायगड जिह्यातील जुन्या पिढीतील डॉ. बी. एम. अर्थात बाबूराव महादू धात्रक यांच्या निधनाने एक सेवाक्रती हरपला आहे. नंदुरबार जिह्यातील रनाळे या अत्यंत दुर्गम भागात जन्मलेल्या डॉ. धात्रक यांचे पितृछत्र दोन वर्षांचे असतानाच हरपले आणि त्यानंतर त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले, पण त्यांची अशिक्षित आई रेवूबाई यांनी ‘‘मी माझ्या मुलाला डॉक्टर करणारच!’’ असा निर्धार केला आणि आईचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण घेण्याकरिता बाबूराव धात्रक यांनी रनाळे गावापासून नंदुरबारपर्यंत रोज अनेक किलोमीटरची पायपीट केली. शाळेत फी भरायला पैसे आणायचे कुठून हा प्रश्न होताच, परंतु त्यांनी हार मानली नाही.

दिवसा नंदुरबारमध्ये शाळेत शिक्षण घेऊन पायपीट करत ते रनाळे गावात आले की, डेअरीतून दूध घेऊन ते घरोघर पोहोचवत, मासेविक्री करत आणि त्यातून जमा झालेल्या पैशांतून ते शालेय शिक्षणाचा खर्च भागवत. शिक्षणासाठी त्यांची सुरू असलेली ही पायपीट त्यांच्या वर्गातील मित्र शरद उपासनी याने पाहिली. उपासनीचे वडील शिक्षक होते. त्याने त्यांच्या वडिलांना बाबूराव धात्रक यांच्या जिद्दीबद्दल सांगताच ‘‘तू नंदुरबारमध्ये माझ्या घरी रहा, पायपीट करू नकोस, अभ्यास करून मोठा हो!’’ असे सांगितले आणि हाच क्षण त्यांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. अमळनेर बोर्डातून ते मॅट्रिकला पहिले आले. ‘‘डॉक्टर हो आणि ग्रामीण भागातील गरीब लोकांची सेवा कर’’ ही आईने व्यक्त केलेली इच्छा बाबूराव धात्रक यांनी प्रत्यक्षात उतरवली. चांगल्या टक्केवारीच्या जोरावर त्यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. बी. जे. मेडिकलमधून वैद्यकीय शिक्षणाची डिग्री घेऊन बाहेर पडलेल्या पहिल्या साठ डॉक्टरांमध्ये ते होते. त्यांची पहिली पोस्टिंग झाली ती नागोठण्याच्या आरोग्य केंद्रात. त्यांच्या रूपाने रायगड जिह्याला पहिला एमबीबीएस डॉक्टर मिळाला. १९६२ पासून त्यांनी रुग्णसेवेत झोकून दिले. नागोठणे व पाली येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केले. त्यांच्या सेवाक्रती स्वभावामुळे केवळ नागोठणे, रोहा नव्हे तर रायगड जिह्यातील अनेक रुग्णांची रोजच गर्दी होत असे.

‘‘फक्त पैशांना नव्हे, तर माणसांना किंमत आहे’’ हे ब्रीदवाक्य डॉ. धात्रक यांनी जपले. पावसाळ्यात नद्यांना पूर आला की, रायगडच्या ग्रामीण भागात दळणवळण ठप्प होत असे, पण एखादा रुग्ण अत्यवस्थ असेल किंवा एखाद्या महिलेचे बाळंतपण जवळ आले असेल तर पावसापाण्याची तमा न करता रात्री-अपरात्री ते होडीने रुग्णांच्या गावात पोहोचत, त्यांच्यावर उपचार करत, अडलेल्या बाळंतिणीची सोडवणूक करत. त्यांच्या या सेवाकार्याची दखल सरकारने घेतली आणि १९६६ साली रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर त्यांची नेमणूक केली. दूषित पाण्यामुळे ‘नारू’ रोगाचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव होत असे. या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी ते रायगडात पायाला भिंगरी लावून फिरले. पाण्यात औषध टाकले तर पाणी विषारी होईल हा ग्रामीण जनतेतील गैरसमज त्यांनी दूर करण्यासाठी मोहीम हाती घेतली. गावागावांत जाऊन त्यांनी विहिरी, तळे आणि पाणीसाठय़ांमध्ये औषधे टाकून हे पाणीसाठे दूषित होण्यापासून रोखले. त्यामुळे रायगडात नारूग्रस्त रुग्णांची संख्याही आटोक्यात आली. याचदरम्यान केंद्र सरकारने कुटुंब नियोजनाच्या शस्त्र्ाक्रियेची मोहीम जाहीर केली. त्यासाठी डॉ. धात्रक यांनी झोकून दिले. रायगड जिह्यातून कुटुंब नियोजनाच्या सर्वाधिक शस्त्र्ाक्रिया झाल्याबद्दल १९६७ साली तत्कालीन राज्यपाल अलियावर जंग यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःचा दवाखाना सुरू केला. रात्री-अपरात्री मोठय़ा आशेने आलेला रुग्ण तिथून कधीही उपचाराविना परत गेला नाही. आपले सेवाकार्य पुढे सुरू राहावे म्हणून त्यांनी राजेंद्र आणि मिलिंद ही दोन मुले व मनीषा या मुलीला डॉक्टर बनवले. त्यांनी ग्रामीण भागातच सेवा करावी असा आग्रह धरला. वैद्यकीय व्यवसाय हा खोऱयाने पैसा ओढण्याचा मार्ग समजला जातो, परंतु डॉ. बी. एम. धात्रक त्याला अपवाद होते.