‘यूपी’मध्ये डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उखडला


सामना ऑनलाईन । कानपूर

उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर या दोन जागांवरील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या युतीचा विजय झाल्याच्या पाठोपाठ उनाव येथे ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उखडून टाकल्याची घटना शुक्रवारी घडली.

बांगरमाऊ येथील हयात नगरात त्या दिवशी बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त ‘भीमकथा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समाजकंटकांच्या एका टोळक्याने भरदिवसा डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उखडून टाकण्याचे संतापजनक कृत्य केले. गुंडांच्या त्या टोळक्याने कार्यक्रमासाठी तिथे जमलेल्या महिलांना आणि बालकांनाही मारहाण केली. या भागात पुन्हा ‘भीमकथा’सारखे कार्यक्रम आयोजित करता कामा नयेत. अन्यथा यापेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी गुंडांच्या टोळक्याने दिली, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये नेहरूंच्या पुतळ्य़ास काळे फासले

बर्दवान : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्य़ास काही समाजकंटकांनी काळे फासल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. हा पुतळा पूर्व बर्दवान जिल्ह्य़ात काटवा शहरात आहे. या घटनेस भाजप जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे, पण भाजपने हा आरोप फेटाळला आहे.