डॉ. बद्रीनारायण बारवाले

सुधारित बियाणांमध्ये जे संशोधन होते त्याचा व्यावसायिक वापर आणि उत्पादन करून ते सामान्य शेतकऱयांपर्यंत पोहोचविणारे अशी डॉ. बद्रीनारायण बारवाले यांची ओळख होती. मराठवाडय़ातील हिंगोली येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बद्रीनारायण यांचे शालेय शिक्षण जालना येथे झाले. मराठवाडय़ाच्या स्वातंत्र्यलढय़ात घेतलेला सहभाग आणि त्यातून वाटय़ाला आलेल्या तुरुंगवासामुळे शिक्षण अर्धवट राहिले. मात्र पारंपरिक शेतीचा वारसा लाभल्यामुळे कौटुंबिक शेतीकडे लक्ष देणे ओघाने आलेच. शेती करताना हिंदुस्थानी कृषी संशोधन संस्था आणि रॉकफेलर फॉऊंडेशन, अमेरिका यांच्याशी त्यांचा संपर्क  आला व त्यांच्या कार्याची माहिती घेत त्यांनी अभ्यास केला. त्यावेळी हरितक्रांतीचे वारे हिंदुस्थानात वाहात होते. सुधारित वाणांचा प्रत्यक्ष उत्पादन करतानाच नवीन, सुधारित वाणांविषयी देशासह जगभरात काय संशोधन चालू आहे याचा बारवाले यांनी सखोल अभ्यास केला. आधुनिक पद्धतीने शेतीचा विकास करत बियाणांच्या व्यापाराचे केंद्रही डॉ. बारवाले यांनी सुरू केले. त्यामुळेच १९६२ मध्ये मका आणि ज्वारीची संकरित वाणे हिंदुस्थानात निर्माण झाली, तसेच भेंडीची नवीन जात बारवाले यांनी विकसित केली. १९६४ साली त्यांनी महाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनीची (महिको) स्थापन केली. शेतकऱयांनी सुधारित बियाणे वापरावीत यासाठी गावोगावी जाऊन मार्गदर्शन केले. डॉ. बारवाले यांनी अद्ययावत संशोधनाच्या सोबतीनेच महिकोच्या माध्यमातून शंभरच्या वर जनुकीय वाणे विकसित केली. त्यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली नसती तरच नवल. त्याच्या या सर्वांगीण कामगिरीमुळे १९७३ मध्ये मराठी विज्ञान परिषदेतर्फे सन्मान प्राप्त झाला. आंतरराष्ट्रीय शिखर संस्थेचे आजीवन सदस्यत्व त्यांना लाभले. हिंदुस्थान सरकारने ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. शेतीतील कामगिरीव्यतिरिक्त डॉ. बारवाले यांनी जालना जिह्यात शाळा व महाविद्यालये तसेच गणपती नेत्रालयासारख्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करून ग्रामीण जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. डॉ. स्वामीनाथन, दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनाने हिंदुस्थानी बियाणे उद्योगाचे ‘पितामह’ काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या