कुटीर रुग्णालयात लवकरच रक्तपेढी, आरोग्यमंत्र्यांनी केली रुग्णालयांची पाहणी

सामना प्रतिनिधी । मोखाडा

कुपोषणाच्या कचाटय़ातून पालघर जिल्हय़ाला बाहेर काढण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून जव्हार, मोखाडय़ात नवजात शिशू अतिदक्षता कक्ष वाढवणार असल्याचे आज जाहीर केले. त्याचबरोबर जव्हारच्या कुटीर रुग्णालयात रक्तपेढीही सुरू करण्यात येणार असून डॉ. दीपक सावंत यांनी आज या भागातील सरकारी रुग्णालयांची पाहणी करून कुपोषण टास्क फोर्सच्या कामगिरीचा आढावा घेतला.

> पालघर जिह्यातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या मोहिमेची आज त्यांनी पाहणी करून अधिकाऱयांबरोबर आढावा बैठक घेतली. नवजात शिशु अतिदक्षता कक्ष तसेच अन्य कामे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यात येणार आहेत.

> जव्हार कुटीर रुग्णालयात असलेल्या १२ नवजात शिशु अतिदक्षता कक्षामध्ये आणखी १६ कक्षांची वाढ करण्यात येणार आहे. मोखाडय़ातील अस्तित्वात असलेल्या पाच नवजात शिशु अतिदक्षता कक्षांचेही पुनर्जीवन करण्यात येणार आहे.

> या दौऱयात आरोग्यमंत्र्यांनी रक्तपेढी सुरू करणार असल्याचेही सांगितले असून त्यासंदर्भात येत्या मंगळवारी मंत्रालयात तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व येथील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे दुर्धर आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना अन्यत्र हलवण्याची गरज भासणार नाही.

कुपोषणाचे प्रमाण घटले
टास्क फोर्सची स्थापना करतानाच डॉ. दीपक सावंत हे महिन्यातील दोन दिवस पालघर जिह्यात येऊन त्याचा आढावाही घेत आहेत. सरकारी योजनांची काटेकोर अंमलबजावणी होते का, याची माहिती घेतात. सामाजिक संस्था, मुंबईतील नामांकित तज्ञ डॉक्टरांची टीम, आदिवासींची पुरागमन शिबिरे, अन्न दिन कार्यक्रम, गरोदर व स्तनदा मातांना पूरकपोषण आहार तसेच कुपोषित बालकांची नियमित तपासणी होत असल्याने पालघर जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटल्याची माहितीही त्यांनी पत्रकारांना दिली.