लेख – कोकण : टिकवलेलं अन् राखलेलं

>>डॉ. दिलीप पाखरे<<

कोकणातील सणांची एक परंपरा आहे. शिमगा, गणेशोत्सव पाहिल्यावर उत्सव फक्त कोकणी माणसांने साजरे करावेत असं वाटतं कारण त्यात काहीतरी जबरदस्त स्पिरिट आहे. रेल्वेगाडय़ांना कितीही गर्दी असो चाकरमानी लटकत लटकत गावात सणाला येणारच. कोकणातल्या सणांमध्ये गोडधोडबरोबरच तिखट जेवण म्हणजे मासांहारी जेवणावर ही माणसं ताव मारतात तेव्हा सणांची मज्जा औरच वाटते. वर्षानुवर्षे कोकणाने या परंपरा वारसा टिकवून ठेवला आहे.

कोकणातील घरांची रचना आजही तशीच टिकून आहे. ग्रामीण भागामध्ये कोकणी घरांचा थाट वेगळाच आहे. चौसेपी वाडय़ासारखं घर…घराबाहेर शेणाचं सारवलेले अंगण, घरात ओटी आतमध्ये माचघर अशी कौलारू घरे उतरत्या पध्दतीने घरं बांधलेली असायची. प्रत्येक घरात पोफळीच्या म्हणजेच सुपारीच्या ताडमाड जून झालेल्या, फळ सुपाऱी  जवळ जवळ न देणाऱ्या झाडातून ते कापून त्यातला आतल्या भागातल्या गर काढायचे. ते पोकळ असायचे. एकदा घराला लावले की कित्येक पावसाळे आरामशीर जायचे.

कोकणचा मूळचा पिंड कष्टाळू, उंच सखल पर्वतराजी, डोंगराळ भाग आणि खोरे यामुळे तो अजूनच कणखर, त्याची घरेही म्हणूनच चिऱ्याची असतात. उतरत्या कौलारू घरात पावसात पाणी गळण्याचे प्रमाण कमी. मात्र पावसाळा संपला की गौरीगणपती, दिवाळी आणि होळीची चाहूल लागायची. कष्टाच्या जीवनात कोकणी माणसाला ही आनंदाची सुगी अनुभवायला मिळायची. प्रत्येक घरासमोर अंगणासाठी सोडलेली जागा. कुटुंबातील व्यक्ती, शेजारीपाजारी एकत्र यायचे. अंगण खोदून काढायचे. मातीचं छान अंगण तयार व्हायचं. धोपटणं किंवा चोपणं खास कोकणी शब्द चोपणे आणि गुरवण़े एक क्रिकेटच्या बॅटसारखं पसरट आणि हातात धरण्यासाठी एक दांडा याने धोपटून धोपटून छान अंगण तयार व्हायचे. त्याच्याच बाजूला आपल्या आजच्या काळात लोकांना बसण्यासाठी जसे लाकडी, सिमेंटची बाकं असतात तसेच धक्के तयार व्हायचे. छान शेणाने सारवले जायचे. एक मंद सुगंध त्याला असायचा.

त्या काळी घराला पडवी, व्हरांडा असायचा. एक खाट टाकलेली असायची. सर्वांची चर्चा, पाहुणेराऊळे यावर विराजमान होत. तिथेच एका कोपऱ्यात झोपाळा असायचा. पडवी आणि व्हरांडा  या सोबतच घरच्या स्त्रिया दळण कांडण घरीच करायच्या. वाईन, उखळ, पोहे कांडण्यासाठी आत गिरडण्यासाठी मातीवर लिपलेलं मोठं जातं. त्याला गिरट म्हणत असत. वाईन म्हणजे दगडामध्ये किंवा लाकडामध्ये कोरलेला खोलगट भाग, तो जमिनीत पुरतात. त्यात भात-पोहे सडतात. ते दगडी असते. त्याला उखळ म्हणतात.

केंबळी घर त्यावेळची एक वैशिष्टय़. ती गवताने शाकारलेली असत. त्या घरांच्या भिंती कुडाच्या असत. केंबळी गवताची तयार केलेली घरे आणि कूड म्हणजे वेताच्या काठीपासून बनवलेलं झाप आणि त्याला मातीचे लिंपण किंवा सारवण़. मात्र या घरांचा एक दमदारपणा म्हणजे पावसातही ही घरे तग धरून असत. उन्हाळय़ात गारवा राहत असे. पावसात दमटपणा शोषून घेत असे. यामध्ये नक्कीच एक वैज्ञानिक सिध्दांत आहे. आज ती घरे खेडय़ातून नामशेष झाली आहेत.

प्रत्येक घराला कुंपण असायचं. माडांच्या पात्यापासून म्हणजेच झावळय़ांपासून ते तयार करायचे. त्याला झापं असंही म्हणत. अंगणात घराच्या मागच्या बाजूला या कुंपणाला लागून या झावळय़ांचे पाय धुण्यासाठी, आंघोळीसाठी बाथरुम असायचे. मातीचं घंगाळ असायचं पाणी ठेवण्यासाठीचे पसरट भांड़े. कोमट किंवा गरम पाणी केळी लागवडीसाठी पोषक असते. ते पाणी त्या बाथरुममधून केळींना मिळायचं. विशेष म्हणजे घरातील स्त्रियांना आंघोळीसाठी घरातही एक न्हाणीघर असायचं. एक दगड असायचा आणि झापांच्या भिंती असायच्या.

तसेच स्त्रियांना नटण्यासाठी आरसावजा पेटी असायची. त्यात कुंकू, कुंकू चिकटवण्यासाठी मेणाची डबी, गंगावण आणि विणलेली जाळी अशी सौंदर्य जपणुकीची सामुग्री असायची. आजही कोकणात पावसाचं पाणी जाण्यासाठी घराच्या छप्परावर केलेली पन्हळी, पावसापासून रक्षण करण्यासाठी इरलं, पाटाचं पाणी…सारं कुठू ना कुठूतरी आढळतं.

स्त्रिया-पुरुष एकत्रित कष्ट करायचे. समाधानाने राहायचे. मानवीन भावभावनांमध्ये अर्थात सर्वच काही आलबेल नसते. त्या असणारच. पण सरासरी समाधान असायचं. एक उदाहरण सांगतो. १९७८ चं वर्ष. प्रादेशिक मनोरुग्णालयात मी ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून जॉइन झालो होतो. पोलीस मुख्यालयाचा चर्चशेजारचा चढ चढून मी जेलनाक्यावर जायचो. त्यावेळी साधारण दुपारच्या वेळेस घरी जाण्यासाठी १२ ते २ च्या काळात हातखंबा, निवळीवरून येणाऱ्या स्त्रिया, तरुण असोत की ज्येष्ठ त्यांना मामी म्हणत. त्या माम्या गाडीतळानजीक शाळा क्र.२च्या जवळ मोळय़ा विकायला बसायच्या. त्या विकून झाल्या की त्या सर्वजणी पोलीस मुख्यालयाच्या रोडवर काटय़ाकुटय़ा जमा करून छोटे छोटे मासे भाजायच्या. त्या भाजणीलाही एक खमंग वास यायचा. त्या भाजलेल्या माशांसोबत या माम्या नाचणीची किंवा तांदळाची भाकरी खायच्या. तृप्त व्हायच्या. थोडावेळ विसावा घेऊन परतीच्या मार्गाला लागायच्या. पायीच १५/१८ किमीचं अंतर चालून यायच्या. चालून जायच्या. या मोळी विकणाऱ्यांना तथाकथित उच्चभ्रू ग्राहक अगं, दीड रुपयाला दे असे सांगून कमी दरात खरेदी करत. त्यांना त्यांचे कष्ट दिसत नव्हते. तरीही ती समाधानाने भावठाव करायची. विक्री व्हायची. आज कोकण मासे खवय्यांसाठी स्पेशल आहे. ताज्या माशांचं मत्स्याहारी जेवणाची कोकणची ओळख तशीच आहे. तसाच आंबा…अवकाळी पावसाने नुकसान झालं किंवा हवामानातील बदलांचा आंब्यावर परिणाम झाला तरी इथल्या बागायतदरांनी आंब्याची लागवड सोडली नाही. तशीच अवस्था काजू आणि सुपारीची आहे.

कोकणातील सणांची एक परंपरा आहे. शिमगा, गणेशोत्सव पाहिल्यावर उत्सव फक्त कोकणी माणसांने साजरे करावेत असं वाटतं कारण त्यात काहीतरी जबरदस्त स्पिरिट आहे. रेल्वेगाडय़ांना कितीही गर्दी असो चाकरमानी लटकत लटकत गावात सणाला येणारच. कोकणातल्या सणांमध्ये गोडधोडबरोबरच तिखट जेवण म्हणजे मासांहारी जेवणावर ही माणसं ताव मारतात तेव्हा सणांची मज्जा औरच वाटते. वर्षानुवर्षे कोकणाने या परंपरा वारसा टिकवून ठेवला आहे. आधुनिकतेचे कितीही आक्रमण झाले तरी कोकणातले शिमग्यातले फाक तुम्हाला व्हॉटसऍप संदेशात वाचून काही वाटणार नाही त्यापेक्षा त्या शिमग्याच्या जल्लोषात ते फाक ऐकल्यानंतर सोशल मीडियापेक्षा कोकणातल्या सोशल जीवनपध्दतीचा आनंद प्रत्यक्षात अनुभवता येतो. z