वजन कमी करण्यासाठी जगात कोणताही शॉर्टकट नाही – डॉ. जगन्नाथ दीक्षित


सामना प्रतिनिधी, पुणे

शरीरात अन्न घालणं सोपं आहे; परंतु ते बाहेर काढणं त्याहून अवघड असतं. आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे जगात वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, असे मत संशोधक व सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ‘आपले आरोग्य आपल्या हाती’ या उपक्रमांतर्गत ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, दत्तात्रय धनकवडे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, दीपाली धुमाळ, रुपाली चाकणकर, मनाली भिलारे यावेळी उपस्थित होत्या.

डॉ. दीक्षित म्हणाले, लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात. लठ्ठ होण्यामागे अनेक कारणे आहेत त्यात अनुवंशिक, वयोमान, व्यायामाचा अभाव, जेवणाच्या सवयी, मद्यपान, धूम्रपान, औषधांचा प्रभाव अशी अनेक कारणे आहेत. आवश्यकतेपक्षा जास्त खाणं, शारीरिक श्रम न केल्याने अतिरिक्त ऊर्जा शरीरात चरबीच्या स्वरूपात साठवली जाते. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. त्यात उपासमार करणारे, खूप अवघड, खर्चिक, नेहमी मार्गदर्शन घ्यावे लागणारे डाएट प्लॅन असे विविध प्रयोग केले जातात. डाएट प्लॅन यशस्वी कसा होईल त्यात एकही पैसा लागू नये, डॉक्टर किंवा तज्ज्ञांची गरज लागू नये, आपल्या शरीरात ऊर्जा साठवण्याचं, निर्मितीचं काम इन्सुलिन करते. रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढल्यास उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, रक्तातील चरबी वाढते आणि वाढलेल्या इन्सुलिनमुळे शरीरात लठ्ठपणा येतो आणि त्यामुळे टाईप २ प्रकारचा मधुमेह होतो. रक्तातील ग्लुकोज पेशी जाळण्यापेक्षा फॅटी अ‍ॅसिड पेशी जाळल्या तर शरीराला २ टक्के ऊर्जा मिळते. शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी शरीरातील इन्सुलिन कमी करणे हा चांगला उपाय आहे.