डॉ. लीला दीक्षित

>>प्रशांत गौतम<<

बालसाहित्यासह अन्य लेखन प्रांत आपल्या कसदार लेखनाने समृद्ध करणाऱ्या अष्टपैलू लेखिका डॉ. लीला दीक्षित गेल्या. लेखिका म्हणून त्यांनी विविध साहित्य प्रकार हाताळले, पण या प्रवासासोबतच त्यांच्यातील कार्यकर्ता प्रांतही तेवढाच महत्त्वाचा होता. स्वतः लेखक असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संस्थेच्या आरंभीच्या वाटचालीत त्यांचे मोठे योगदान राहिले होते. बालसाहित्याच्या क्षेत्रात एक सुवर्णकाळ होता. भा. रा. भागवत, लीलावती भागवत, यदुनाथ थत्ते, राजाभाऊ मंगळवेढेकर, सुधाकर  प्रभू अशी एकापेक्षा एक दिग्गज लेखक आणि कार्यकर्ता मंडळी लाभली होती. डॉ. दीक्षित यांच्या निधनाने या जुन्या पिढीतील महत्त्वाचा दुवा आता निखळला आहे. या सर्वांना बालसाहित्याच्या क्षेत्राबद्दल कमालीची आस्था होती. यातील प्रत्येक जण स्वतंत्र प्रतिभेचा लेखक होता आणि हाडाचा कार्यकर्ताही. या जुन्या पिढीने अ.भा. मराठी बाल कुमार साहित्य संमेलन संस्थेची स्थापना केली. तब्बल पंचवीस वर्षे संमेलनात सातत्य ठेवल़े संमेलनाच्या विविध स्पर्धांच्या नाविन्यपूर्ण आयोजनात किंवा पुस्तक हंडी या आगळ्या-वेगळ्या उपक्रमात सतत सहभाग असायचा त्यात डॉ. दीक्षित यांचाही उत्साहपूर्ण सहभाग असायचा.

४ फेब्रुवारी १९३५ साली कोकणातील गुहागर येथे जन्म झालेल्या लीलाताईंनी पुणे विद्यापीठात एम.ए. आणि नंतर पीएच.डी. केली. १९७० ते १९९३ या काळात एस.एन.डी.टी. गृहविज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीनंतरचाही काळ त्यांनी लेखन आणि वाचनात व्यतीत केला. लहान मुलांच्या भावविश्वाशी एकरूप होऊन त्यांनी बालसाहित्य क्षेत्रात आपली स्वतःची स्वतंत्र मुद्रा उमटवली. धीरू, मैत्री, टिल्लोजी, बहाद्दर बल्लू या बाल कादंबऱ्या, सुमनकथा, सोन्याचे फळ, आमचाही संप, अक्षय शिदोरी, गमतीदार कथा, लाखाचे बक्षीस, नाच रे मोरा, आजीची गोधडी, कुशल, कथा भाजी-कोशिंबिरीची, दूरदेशीच्या कथा, अकलेचे झाड, सागरसूर, सुरेल बक्षीस, क्रांतिकारकांच्या कथा, अमोल कथा, मुके मित्र, साखर आजोबा, रुसराणी, शुभंकरोमि, पंख नवे, पोपटाचे झाड, बजरंग यासारखे बालकथासंग्रह, गंमतगाव, मजाच मजा, गाणारे झाड यासारखे बालकविता संग्रह, फुलांना मिळाले रंग, बिल्वदान या नाटुकली बालसुलभ लेखनशैलीची साक्षच देतात. बालसाहित्याचा वैविध्यपूर्ण लेखनप्रांत त्यांनी वाचनाभिमुख तर केलाच, पण त्याचसोबत अन्य लेखन प्रांतातही आपल्या लेखनाचे वेगळेपण जपले. कादंबरी हा त्यांचा आवडीचा प्रांत. गोत, चंदनवेल, स्वामी अपरान्ताचा, विवेक आयना हे लेखन असो, प्राचीन मराठी साहित्यातील स्त्र्ााrरूपसारखा समीक्षा संग्रह असो, असा उगवला स्वातंत्र्य सूर्य, क्रांतिपर्व, टिळक पर्व, गांधी पर्व यासारखे ऐतिहासिक लेखन असो नाही तर समाजसुधारक मालामध्ये लिहिलेले दहा जणांचे चरित्र लेखन असो, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे वैविध्यपूर्ण लेखन दिसते. या चरित्र लेखनात डॉ. दीक्षित यांनी महात्मा फुले, समाजसुधारक आगरकर, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, संत गाडगेबाबा, दलित मित्र बाबासाहेब आंबेडकर आणि पंडिता रमाबाई अशा थोर विभूतींच्या कार्याचा नि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विस्ताराने अभ्यास केला. तसेच साखर माणसे, मोकळे आकाश यासारखे ललित गद्य लेखनही वेगळ्या धाटणीतून केले त्याचसोबत विविध वृत्तपत्रांतून लेखन सहभाग, विविध ठिकाणच्या महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवरची अभ्यासपूर्ण व्याख्याने अशा कितीतरी पैलूंमधून लीलाताई दीक्षित यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा परिचय हा साहित्य रसिक आणि आस्वादकांना झाला. लेखन मग ते बालसाहित्याच्या क्षेत्रातील असो, नाही तर विविध साहित्य समीक्षा या प्रांतातील असो, त्यातील बहुतेक साहित्यकृतींचा राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा पुरस्कारांनी गौरव झाला होता. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी ना. सी. फडके प्रतिष्ठानचा कमल फडके, परिवर्तन संभाजीनगरचा ग. ह. पाटील पुरस्कार आणि पुणे महानगरपालिकेचा जीवन गौरव त्यांना लाभले होते. त्यांनी आपल्या साहित्य प्रवासात विविध साहित्य प्रकार हाताळले असले तरी त्यांची मूळ नाळ ही बालसाहित्य क्षेत्राशी कायम जुळलेली असायची. परभणी येथे झालेल्या १९ व्या अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना लाभला होता. त्यांच्या निधनाने लेखिका आणि कार्यकर्ती हरपली आहे.