डॉ. एम. व्ही.श्रीधर यांचा बीसीसीआय महाव्यवस्थापक पदाचा राजीनामा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हैदराबाद क्रिकेट संघटनेचे प्रमुख असताना आर्थिक गैरप्रकार केल्याचा आरोप असलेले बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (क्रिकेट कार्यक्रम संचालन) डॉ. एम. व्ही.श्रीधर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालय नियुक्त बीसीसीआय प्रशासकीय समितीने (सीओए) डॉ. श्रीधर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

डॉ. श्रीधर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) ट्रेनर पदावर सोहम देसाई यांची वर्णी लावली. ही नियुक्ती करताना त्यांनी ट्रेनरच्या परिक्षेत टॉपला आलेल्या अन्य उमेदवारांना डावलले असा गंभीर आरोप त्यांच्यावर होता. या आरोपानंतर प्रशासकीय समितीने (सीओए) डॉ. श्रीधर यांना पदावर ठेवण्यास आक्षेप नोंदवला होता.