डॉ. मनमोहन सिंग यांची ‘मन की बात’!

>>नीलेश कुलकर्णी<<  

nileshkumarkulkar>[email protected]

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ‘प्रणव मुखर्जी हे माझ्यापेक्षाही चांगले पंतप्रधान बनले असते,’ असे सांगत काँग्रेस पक्षांतर्गत ‘‘शिळ्या कढी’ला सुमारे दीड दशकानंतर पुन्हा आधण दिले आहे. एका समारंभात डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या ‘हायकमांड’ सोनिया गांधी यांना साक्षीला ठेवत ही ‘मन की बात’ मध्यंतरी केली. दहा वर्षे काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारचा गाडा चालवताना मनमोहन सिंग यांच्यासारख्या सरळ माणसाची अनेकदा ‘दाटून कंठ येतो’ अशी अवस्था होत होती. मात्र सत्तासुंदरीला सोडणे त्यावेळी मनमोहन सिंगांना जमले नाही. आता सत्ता गेल्यानंतर साडेतीन वर्षांनी त्यांनी आपला घसा साफ केला. हे मनमोहन सिंग यांचे अरण्यरुदन समजायचे की काँग्रेसची शोकांतिका, हाही तसा प्रश्नच आहे.

प्रणव मुखर्जी यांना यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधानपद नाकारण्यामागे काँग्रेसअंतर्गत राजकारणाचे अनेक पदर होते. पंतप्रधानपदासाठी सर्वार्थाने योग्य असतानाही प्रणवदा म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’ ठरतील या भीतीतून सोनिया गांधी यांनी अनपेक्षितपणे मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी निवड केली.  पडद्याआडून स्वतः सोनिया आणि त्यांचे चाणक्य सल्लागार अहमद पटेल देशाचा कारभार हाकत असत तर पडद्यावर प्रणव मुखर्जी सरकारचा गाडा चालवत हा इतिहास सर्वश्रुत आहे. नियती आणि काँग्रेस या दोघांनीही प्रणव मुखर्जींवर अन्यायच केला. स्वतःला पंतप्रधानपद मिळू शकत नाही हे राजकीय कटू सत्य लक्षात आल्यानंतर सोनिया गांधी यांना त्यांच्या ‘कंट्रोल’मध्ये राहणारी व्यक्तीच पंतप्रधानपदी हवी होती. त्या निकषात प्रणव मुखर्जी ‘अनफिट’ होते. त्यातच इंदिरा गांधी यांची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर राजीव गांधी यांनी वडीलकीच्या नात्याने त्यावेळी प्रणवदांना ‘व्हॉटस् नेक्स्ट?’ असा प्रश्न त्या शोकाकुल वातावरणात केला असता प्रणवदांनी मी ज्येष्ठ असल्याने अनुभव व ज्येष्ठता या निकषानुसार मला संधी मिळायला हवी, असे उत्तर दिले होते. ते उत्तर राजीव यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाच्याही जिव्हारी लागले ते कायमचेच. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्या अखत्यारीत काम केलेले मनमोहन सिंग प्रणवदांचे ‘बॉस’ म्हणजे पंतप्रधान झाले. काळाचा महिमा असतो तो असा! अर्थात असे असले तरी मनमोहन यांनी प्रणवदांना कायमच सन्मानाने वागवले. मुखर्जींनीही मनात कटुता न ठेवता अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधानपदाचा सर्वच कार्यभार हाकून यूपीए सरकार सक्षमपणे चालवून दाखविले. यूपीए सरकारविरोधातील अविश्वास ठराव असो की जंतरमंतरवरचे आंदोलन, यूपीएवरच्या संकटांचा मुकाबला ‘संकटमोचक’ प्रणवदांनी खंबीरपणे केला. पुढे त्यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतरच यूपीएची घसरगुंडी सुरू झाली. प्रणवदांच्या अभावाने लुळ्यापांगळ्या झालेल्या सरकारच्या अब्रूची लक्तरे विरोधक आणि समाजमाध्यमे, मीडियाने पार वेशीवर टांगली. मनमोहन सिंग सज्जन गृहस्थ असले तरी त्यांच्या कार्यकाळात देशाची सर्वाधिक लयलूट झाली हे वास्तव जनतेने स्वीकारले. त्याची परिणती काँग्रेसच्या दारुण पराभवात झाली. पराभव माणसाला बरेच काही शिकवतो असे म्हणतात. सत्ता गेल्यावर साडेतीन वर्षांनंतर मनमोहन सिंग यांनी पराभवाचे ‘अचूक विश्लेषण’ केले. मात्र त्याचे प्रायश्चित्त घेण्याएवढीही राजकीय स्थिती सध्या काँग्रेसची राहिलेली नाही. आज प्रणवदांचे गोडवे गाणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांनी योग्य वेळी पंतप्रधानपदाचा ‘त्याग’ मुखर्जींसाठी केला असता तर देशाचा राजकीय इतिहास नक्कीच बदलला असता. ‘देशाला न लाभलेले एक उत्कृष्ट पंतप्रधान’ म्हणून प्रणवदांची राजकीय इतिहासात नक्कीच नोंद होईल.

इवांकाचे ‘ट्रम्प कार्ड’!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपच्या वर्तुळात ‘गेमचेंजर’ म्हटले जाते. राजकीय विजयासाठी मोदी काय शक्कल लढवतील याचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही. यंदा ‘विकास गांडो थयो छे’मुळे गुजरातचा पेपर तसा अवघड असल्यामुळे आणि दस्तुरखुद्द पंतप्रधानांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने मोदी सावध पावले टाकत आहेत. जपानी पंतप्रधान शिंजो आबे आणि त्यांच्या सुविद्य पत्नीच्या शुभहस्ते मोदींनी बुलेट ट्रेनच्या निमित्ताने गुजरात विधानसभेच्या प्रचाराचा नारळ वाढविल्याची टीका विरोधक करत असतानाच मोदी अजून एक ‘ट्रम्प कार्ड’ खेळण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदींचा अगदीच बराक वगैरे म्हणण्याइतका ‘दोस्ताना’ नसला तरी बरे संबंध आहेत. ट्रम्प यांची कन्या इवांका पुढील महिन्यात हैदराबादमध्ये होणाऱ्या जागतिक उद्योग संमेलनाला हजेरी लावण्याची चिन्हे आहेत. त्यात जगभरातले १५० जानेमाने उद्योजक सामील होणार आहेत. इवांका अनायसे आल्याच आहेत हिंदुस्थानात तर त्यांना ‘विकासा’चे ‘गुजरात मॉडेल’ दाखविण्याचा मोदींचा मानस आहे म्हणे. याच महिन्यात मोदी फिलिपाइन्समध्ये होणाऱ्या आसियान परिषदेसाठी जाणार आहेत. त्यावेळी ते ट्रम्पतात्यांना, ‘लेकीला चार दिवस गुजरातला पाठवा’ असा प्रेमळ आग्रह मोदी करू शकतात. बघूयात ट्रम्पतात्या त्यांना कितपत प्रतिसाद देतात ते!