‘या’ थोर इंजिनियरच्या सन्मानार्थ साजरा होतो इंजिनियर्स डे

सामना ऑनलाईन । मुंबई

इंजिनियरिंग ही पदवी नाही, तर जीवन आहे या ध्येयावर जगणाऱ्या भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या या थोर इंजिनियरचा आज जन्मदिवस. कर्नाटकचे भगीरथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान अभियंत्याचा जन्मदिन इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉ. मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांचा जन्म म्हैसूरमधील कोलार जिल्ह्यात चक्काबल्लापूरमध्ये १५ सप्टेंबर १८६१ मध्ये झाला. शालेय शिक्षण कोलार तर महाविद्यालयीन शिक्षण बेंगळुरूच्या सेंट्रल कॉलेजमधून पूर्ण केलं. १८८१मध्ये बीएच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या विश्वैश्वरय्या यांनी पुण्यातील महाविद्यालयात इंजिनियरिंगसाठी प्रवेश घेतला. तिथून आपलं इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण करत बॅचलर इन इलेक्ट्रॉनिक्समध्येही अव्वल स्थान पटकावलं. काही काळ महाराष्ट्रात नाशिक इथे सहाय्यक इंजिनियर पदावरही ते कार्यरत होते.

त्यानंतर कर्नाटक हीच आपली कर्मभूमी मानत विश्वैश्वरय्या यांनी कर्नाटकचा कायापालट केला. कृष्णराजसागर धरण, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, म्हैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ म्हैसूर या संस्था ही त्यांच्या प्रयत्नांना आलेली फळं आहेत. चंदनाच्या ज्या साबणासाठी म्हैसूर हे शहर प्रसिद्ध आहे तो म्हैसूर सँडल सोप हेही त्यांच्या कल्पनेतून साकारलेलं उत्पादन. त्यांच्या या भगीरथ प्रयत्नांमुळे उद्योग आणि संपन्नतेची गंगा कर्नाटकमध्ये आली. म्हणूनच कन्नडिगांमध्ये ते कर्नाटकचे भगीरथ म्हणून ओळखले जातात.

विश्वैश्वरय्या यांच्या कुशाग्र बुद्धीची आणि इंजिनियरिंगमधील ज्ञानाची चुणूक त्यांच्या आयुष्यातील एका प्रसंगावरून अनुभवता येते. विश्वैश्वरय्या एकदा रेल्वेतून प्रवास करत होते. तो काळ अर्थातच पारतंत्र्यातला होता. त्यामुळे गाडीतील बहुतांश प्रवासी हे इंग्रज होते. त्यात एक सावळ्या रंगाचा आणि अतिशय साध्याशा पोशाखात एक प्रवासी गंभीर चेहऱ्याने प्रवास करत होता. इंग्रज त्याच्याकडे पाहून तो अशिक्षित असावा, अशा कल्पनेने त्याची थट्टा करत होते. मात्र, तो माणूस त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत शांत बसून होता.

गाडीचा प्रवास सुरू असतानाच अचानक तो प्रवासी उठला आणि त्याने रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढली. अतिशय वेगात असलेली रेल्वे अचानक थांबल्यामुळे उर्वरित प्रवासी वैतागले आणि त्या माणसाला शिवीगाळ करू लागले. थोड्या वेळात तिथे एक गार्ड हजर झाला. त्याने साखळी ओढणाऱ्या माणसाविषयी चौकशी केली. तो सावळा माणूस पुढे आला आणि त्याने आपण साखळी ओढल्याचं कबूल केलं. गार्डने असं करण्याचं कारण विचारलं असता, तो माणूस म्हणाला की, इथून एक फर्लांगभर अंतरावर रेल्वेचे रूळ उखडले आहेत. या उत्तराने चक्रावलेल्या गार्डने त्याला विचारलं की, तुला हे कसं कळलं? तेव्हा तो सावळा माणूस उत्तरला, गाडीच्या नेहमीच्या गतीत फरक पडलेला मी अनुभवतो आहे. शिवाय रेल्वेच्या रुळातून आलेल्या आवाजाच्या गतिवरून मला पुढे धोका असल्याची सूचना मिळत आहे.

या गोष्टीची खात्री करून गार्ड त्या माणसाला सोबत घेऊन जेव्हा तिथून काही अंतरावर पोहोचला, तेव्हा तिथे खरोखर रेल्वे रूळ उखडल्याचं त्याच्या निदर्शनाला आलं. तोवर इतर प्रवासीही तिथे येऊन पोहोचले होते. जेव्हा त्यांना या माणसाच्या प्रसंगावधानामुळे आपला जीव वाचल्याचं कळलं तेव्हा ते त्याची प्रशंसा करू लागले. गार्डने त्या माणसाला त्याचं नाव विचारलं, तेव्हा तो माणूस उद्गारला.. ”मी एक इंजिनियर आहे, माझं नाव डॉ. एम विश्वैश्वरय्या”. अशा या थोर अभियंत्याचा हिंदुस्थान सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न या पुरस्काराने १९५५मध्ये त्यांचा गौरव केला.