सिने अभिनेते अतुल कुलकर्णी यांना डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार जाहीर

सामना प्रतिनिधी । उदगीर

उदगीर आणि मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विकासात वैचारिक योगदान देणारे दिवंगत समाजवादी विचारवंत प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत पुरोगामी विचारांची पेरणी करणाऱ्या व्यक्तींना छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम स्मृतीचिन्ह शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गतवर्षी हा पुरस्कार माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते शिक्षक आमदार कपिल पाटील यांना प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कारचे हे दुसरे वर्ष असून यावेळी हा पुरस्कार सिने अभिनेते अतुल कुलकर्णी यांना देण्यात येणार असल्याची माहिती अजित शिंदे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. १० सप्टेंबर १९६५ रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे जन्मलेल्या अतुल कुलकर्णी यांनी हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलगु, कन्नडा आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केलेला असून महाराष्ट्रातील पालघर जिल्हातील आदिवासी मुलांसाठी उभारलेले त्याचे काम उल्लेखनीय आहे. यापूर्वी अनेक पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या सिने अभिनेते अतुल कुलकर्णी यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात अतुल कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत अलका धूपकर घेणार आहेत. सिने अभिनेते अतुल कुलकर्णी यांना हा पुरस्कार येत्या २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पुरस्कार समितीचे कार्यवाह अजित शिंदे, दिलीप वाघमारे, अंकुश गायकवाड, पुरुषोत्तम भांगे, धनाजी बनसोडे, रवींद्र हसरगुडे, विनायक चाकुरे, राजकुमार करंजे आदींच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या