डॉ. पांडुरंग ढोले

5

>>अनिल कुचे<<

राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष तथा चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांचे मध्यंतरी निधन झाले. त्यामुळे एक लढवय्या शेतमजुराचा नेता पडद्याआड गेला. बोलेरो गाडी चालविताना हृदयविकाराचा झटका येतो काय आणि गाडी झाडावर आदळते काय? कधी कधी नियतीच्या मनात काय असते हेच आपल्याला कळत नाही. डॉ. ढोले यांचा जन्म चांदूर रेल्वे तालुक्यात असलेल्या कुऱहा येथे २ फेब्रुवारी १९५० रोजी झाला. त्यांना सुरुवातीपासूनच वैद्यकीय क्षेत्राची आवड होती. म्हणून ते व्यवसायात डॉक्टर झाले. आरोग्य शिक्षण संस्थेचे १९७९ पासून अध्यक्ष होते. त्यांनी भरत व्यायामशाळेचेही अध्यक्ष म्हणून काम पाहिले. १९८० ते ८८ दरम्यान मंडळ आयोगाच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पर्यटन विकास महामंडळाचे सभापती, १९८४-९० च्या काळात चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती म्हणून त्यांची निवड झाली होती. शेतकऱ्यांशी संबंधित बाजार समितीचा कारभार चालतो, त्याआधारे त्यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले म्हणून त्यांना शेतकरी नेता म्हणून ओळखले जात होते. १९९० ते ९५ या काळात ते चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर मतदारसंघातून ते जिल्हा परिषदेवर निवडून आले. १९९४ मध्ये चांदूर रेल्वे तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक नद्यांना महापूर आला. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीची वेळेवर परतफेड करावी, यासाठी त्यांनी प्रशासन स्तरावर प्रयत्न केले व अनेक कुटुंबीयांना मदत मिळवून दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. यादरम्यान डॉ. ढोले यांनी मोर्चे व उपोषणाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून दिला. या कार्याची पावतीही त्यांना मिळाली. १९९५ मध्ये ते राष्ट्रीय जनता दलाच्या तिकिटावर चांदूर रेल्वे मतदारसंघातून विजयी झाले. शेतकऱयांचे प्रश्न विधानसभेत मांडणे, त्याचा पाठपुरावा करणे या त्यांच्या नेतृत्वगुणामुळे शेतकऱयांना न्याय मिळत गेला. अशा लढवय्या नेत्याचे अकाली जाणे हे या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी नुकसानकारकच आहे.