लेख : महर्षी वेदव्यासांचे वेदप्रसाराचे कार्य

>>डॉ. रामनाथ खालकर<<

आजच्यासारखी प्रभावी प्रसारमाध्यमे नसताना व्यासांनी स्वतः व शिष्यांकरवी वेद व महाभारत हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले. व्यासांच्या या साहित्यिक व सांस्कृतिक कार्यास जगाच्या इतिहासात तोड नाही. महाभारतकार व्यासांनी शिष्यांना वेदप्रसार करण्यास सांगितले. स्वतः व्यासांनीही वेदांमधील विचार सामान्यांपर्यंत पोहोचविले.

महर्षी वेदव्यासांच्या वेदांविषयीच्या कार्याचे वेदाध्ययन, वेदाध्यापन व वैदिक विचारांचा प्रसार असे तीन भाग पडतात. व्यासांपूर्वी अनेक ऋषींना स्फुरलेले मंत्र व सूक्ते विखुरलेल्या अवस्थेत होती. व्यासांनी सूक्तांच्या स्वरूपातील वेदमंत्र गोळा केले. यातून ‘ज्ञानकोशा’च्या स्वरूपातील ‘वेद’ अस्तित्वात आला. सुरुवातीस एकच वेद असल्याचे म्हटले जाते ते यामुळेच. व्यासांनी या संग्रहित वेदज्ञानाचा अथपासून इतिपर्यंत अभ्यास केला. त्याची व्यवस्थित मांडणी केली. आजच्या भाषेत बोलावयाचे झाल्यास व्यासांनी प्रचंड अशा वेदज्ञानाचे संकलन, संपादन व विभाजन केले. वेदज्ञानाची ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद अशा चार वेदांमध्ये विभागणी केली आणि एका वेदापासून चार वेद अस्तित्वात आले.

व्यासांनी वेदाध्ययनानंतर वेदांचे अध्यापनही केले आहे. त्यांनी आपल्या पुत्रास म्हणजे शुक मुनीस व पैल, वैशंपायन, जैमिनी व सुमंतु या चार शिष्यांना वेद शिकवले. या सर्व शिष्योत्तमांना त्यांनी वेद व वेदविचारांचा प्रसार करण्यास सांगितले. या सर्व शिष्यांना त्यांनी वेदप्रसाराचे कार्य करत असताना काय करावे व काय करू नये याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांनी शिष्यांना सांगितले-

१) ज्याच्या चारित्र्याची परीक्षा झालेली नाही अशांना वेद सांगून नका.

२) क्रतहिनास वेद शिकवू नका.

३) अनेक शिष्य निर्माण करून वेदांचा प्रसार करा.

४) तुमच्या शिष्यांना अनुचित व भयप्रद काम करण्यास सांगू नका.

५) चारही वर्णांच्या लोकांना वेद ऐकवा.

६) वेदाध्ययन महत्त्वाचे असल्याने ते अवश्य केले पाहिजे.

व्यासांनी त्यांच्या शिष्यांना केलेला हा उपदेश महाभारतातील शांतीपर्वामध्ये ३२७ व्या अध्यायातील ४१ ते ४९ या श्लोकांमध्ये वाचावयास मिळतो.

महाभारतकार व्यासांनी शिष्यांना वेदप्रसार करण्यास सांगितले. स्वतः व्यासांनीही वेदांमधील विचार सामान्यांपर्यंत पोहोचविले. वेदविचार सामान्यांना समजावून सांगण्यासाठीच त्यांनी महाभारत लिहिले. ते म्हणतात, ‘महाभारत पूर्ण चंद्राप्रमाणे असून या चंद्र प्रकाशात वेदरूपी ज्योत्स्ना प्रकाशित झालेली आहे व याच प्रकाशात मनुष्याची बुद्धीरूपी कुमुदिनी उमलली आहे’. तसेच व्यासांच्या मते इतिहास व पुराणांच्या मदतीने वेदांचा अर्थ करावयास हवा. वेदांचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने महाभारताचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, ‘अल्पबुद्धीचे लोक माझ्यावर आघात करतील (म्हणजे अर्थाचा अनर्थ करतील) अशी वेदास भीती वाटते. जे विद्वान व्यासरचित वेदास म्हणजे महाभारतास इतरांना ऐकवतील त्यांना वेदाचा योग्य तो अर्थ कळतो. म्हणूनच महाभारत हे वेदांवरील श्रेष्ठ भाष्य असल्याचे म्हटले जाते. वेदांमधील विजिगिषु जीवनवादाचा परिचय करून देण्याचे महत्त्वाचे कार्य व्यासांनी त्यांच्या महाभारताद्वारे केले आहे.

आज आषाढ महिन्यातील पौर्णिमा. ही पौर्णिमा जशी गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते तशीच ती व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. आजच्यासारखी प्रभावी प्रसारमाध्यमे नसताना व्यासांनी स्वतः व शिष्यांकरवी वेद व महाभारत हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले. व्यासांच्या या साहित्यिक व सांस्कृतिक कार्यास जगाच्या इतिहासात तोड नाही. वेद, महाभारत व श्रीमद्भगवद्गीतेतील विचार विधायक व विजिगिषु आहेत. ‘स्वतःचे काम प्रामाणिकपणे करत आनंदाने तेजस्वीतेने, लाचार न होता यशस्वी जीवन जगा’ अशा विजिगिषु विचारांची आज सर्वसामान्य लोकांना गरज आहे. या विचारांनी त्यांच्यात यशस्वी जीवन जगण्याविषयी प्रेरणा व उत्साह निर्माण होईल. महाभारताच्या माध्यमातून वेद व श्रीमद्भगवद्गीतेतील हे जीवनदायी विचार सामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या व्यासांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञतेतून नमस्कार.

नमोस्तु ते व्यास विशालबुद्धे

फुल्लारविन्दायत पत्रनेत्र।

येन त्वया महाभारत तैलपूर्णः

प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः।।

अर्थात, प्रफुल्ल कमळाच्या दीर्घ पाकळीप्रमाणे नेत्र असलेल्या, विशाल बुद्धीच्या व्यास मुने, ज्या तुम्ही महाभारतरूपी तेलाने भरलेला हा गीतारूपी ज्ञानमय प्रदीप पेटविलात त्या तुम्हाला नमस्कार असो.