बांधकाम दुर्घटनेतील संबंधितांवर जबाबदारीसाठी धोरण तयार करावे : डॉ. रणजित पाटील


सामना ऑनलाईन । मुंबई

इमारत दुर्घटनेमध्ये वास्तुविशारद, संरचनात्मक अभियंता (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांच्याबरोबरच साईट सुपरवायझर व फॉर्म वर्क कोऑर्डिनेटर यांच्याही जबाबदाऱ्या निश्चित करण्यासंदर्भात धोरण आखावे. त्याचा समावेश मुंबई वगळता राज्यातील इतर ठिकाणच्या इमारत बांधकामासंदर्भातील नव्याने तयार करण्यात येत असलेल्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत करण्याच्या सूचना नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या. तसेच सुरक्षा विषयक सर्व प्रकारच्या उपाय योजना व सल्लागारांच्या नेमणुका केल्याशिवाय कोणत्याही बांधकामांच्या परवाने अथवा पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, असे निर्देशही डॉ. पाटील यांनी बुधवारी दिले.

बांधकाम सुरु असलेल्या इमारतींच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातामधील संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आयएसएसईचे अध्यक्ष धैर्यशील खैरे पाटील, उमेश जोशी, जी. ए. भिलारे आदी उपस्थित होते. नव्याने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात घडल्यानंतर कोणावर जबाबदारी निश्चित करावी, यासंबंधी नियमावली तयार करावी. तसेच यामध्ये वास्तुविशारद, संरचनात्मक अभियंता यांच्या जबाबदारी बरोबरच साईट सुपरवायझर व फॉर्म वर्क कोऑर्डिनेटर यांची जबाबदारी निश्चित करावी. यासंदर्भात पुणे महानगरपालिकेने सूचना दिल्या आहेत. या सूचनांचा समावेश नव्याने तयार करण्यात येत असलेल्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीमध्ये करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

भविष्यात एखाद्या बांधकामावर दुर्घटना झाल्यास पाच सदस्यांची तांत्रिक समिती नेमून नवीन होणाऱ्या नियंत्रण नियमावलीनुसार जबाबदारी निश्चित करून अहवाल द्यावा. त्यानंतर संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी विनंती इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरर इंजिनिअर संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीची नोंद नवीन नियमावलीत घेण्याच्या सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या.