डॉ. एस.एस. भोसले…


प्रशांत गौतम

प्रसिद्ध साहित्यिक तथा समीक्षक डॉ. एस. एस. भोसले यांच्या निधनाने साहित्य आणि समीक्षा क्षेत्राची हानी झाली आहे. ज्यांना त्यांचा सहवास लाभला त्या सर्वांना भोसले सरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. त्यांच्या सहवासातील गप्पा म्हणजे साहित्य कला, विनोद, समीक्षा यांच्या रसाळ गप्पांची मेजवानी असे. भोसले सरांच्या स्वभावातच कोल्हापूर आणि मराठवाडी माणसाचं परिपूर्ण मिश्रण असायचे. एखाद्याशी बोलताना ते हमखास बरं का, अशी सुरुवात करायचे. पुढे तीच त्यांची ओळख झाली. त्यांच्या गप्पांमधून विद्यार्थ्यांबद्दल आत्मीयता, नवीन लेखकाबद्दलची उत्सुकता, ज्येष्ठ व्यक्तींबद्दलचा आदर व्यक्त व्हायचा. कोल्हापूर जिह्यातील कागल येथे डॉ. एस. एस. भोसले यांचा जन्म झाला. कोल्हापूर येथील वास्तव्याच्या काळात त्यांना ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक ‘झोंबी’कार डॉ. आनंदी यादव वर्गमित्र लाभले. महाविद्यालयीन वाटचालीच्या उंबरठय़ावर असतानाच डॉ. भोसले यांना प्रख्यात साहित्यिक ज्ञानपीठ विजेते लेखक वि. स. खांडेकर यांचा लेखनकामाच्या निमित्ताने प्रदीर्घ सहवास लाभला. खांडेकर ओघवत्या भाषेत एखादी कथा, कादंबरी सांगायचे आणि सुवाच्य अक्षरात लिहिण्याचे कार्य डॉ. भोसले करायचे. या प्रदीर्घ सहवासामुळे त्यांच्याशी खांडेकरांचा स्नेह जमला. कोल्हापूरच्या वास्तव्यात प्राध्यापक म्हणून कार्य करताना त्यांना ‘पानिपत’कार विश्वास पाटीलसारखा साहित्य क्षेत्रातील जाणकार विद्यार्थी लाभला. १९७९च्या सुमारास डॉ. भोसले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून रुजू झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे अनेक विद्यार्थी पुढील काळात नावारूपाला आले. राज्य साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ यांचे सदस्य राहिलेल्या भोसले यांच्या नावावर १८ स्वलिखित आणि २२ संपादित पुस्तके जमा आहेत. ‘आप्पासाहेब पवार’, ‘राजर्षी शाहू संदर्भग्रंथ’, ‘नागरी लोकपरंपरेचे आविष्कार’, ‘वि. स. खांडेकर व्यक्ती आणि साहित्य’ अशी अनेक पुस्तके विद्यार्थ्यांसाठी आजही महत्त्वाची आहेत. त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सहवासात राहण्याचीही संधी मिळाली होती.