गोवर रुबेला लस मार्गदर्शनासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ. सय्यद जिल्हा दौर्‍यावर

राजेश देशमाने । बुलढाणा

गोवर रुबेला लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते या अफवेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लीम शाळातील मुलांना लस देण्यास पालकानी नकार दिला होता. त्यामुळे गेल्या आठ दिवसात मुस्लीम शाळात प्रतिसाद मिळत नाही हे पाहून प्रशासनाने ही मोहीम यशस्वी करायची हे ठरविले असून प्रामुख्याने मदरसा मुस्लीम वस्तीत बैठका घेतल्या. त्यानंतर जिल्ह्यातील मुस्लीम शिक्षकांची बैठक घेतली व आता जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ. मुजीब सय्यद यांना जिल्ह्यात बोलावले असून ते जिल्ह्यात दाखल होवून गावोगावी मुस्लीमांच्या सभा घेत आहे.

महाराष्ट्र राज्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने सोशल मीडियामधून ‘व्हायरल’ अफवांमुळे मुस्लिम समाजामध्ये निर्माण झालेल्या गैरसमजुतींचे निराकरण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ. मुजीब सय्यद हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले असून त्यांनी दि. ५ डिसेंबर रोजी बुलढाणा व खामगाव तालुक्यांना भेटी देऊन आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी, मुस्लिम डॉक्टर्स, पदाधिकारी, मुस्लिम समाजातील पत्रकार, पिंपळगावराजा येथील मस्जिदचे इमाम आणि प्रतिष्ठित मुस्लिम समाजबांधवांच्या बैठकी घेऊन गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने ‘गैरसमज आणि तथ्ये’ या विषयावर प्रकाश टाकत सविस्तर माहिती देऊन बालकांच्या आरोग्यासाठी आणि निरोगी समाजासाठी निर्मितीसाठी गोवर रुबेला लसीकरणाचे महत्व पटवुन दिले. तसेच आज दि.६ डिसेंबर रोजी मलकापूर येथील शाळा, नगर परिषद, उपजिल्हा रुग्णालय इत्यादी कार्यालयात डॉक्टर्स, पदाधिकारी, अधिकारी व पालकांच्या सभा घेऊन डॉ. मुजीब सय्यद यांनी माहिती दिली. शाळेमध्ये उपस्थित पालकांमध्ये सभेच्या शेवटी प्रश्न विचारून या मोहिमेविषयी शंका समाधान झाल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.

लसीकरण सक्षमीकरण जिल्हास्तरीय कृती समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन एस यांचे मार्गदर्शनामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत व जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र गोफने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जैनुद्दीन मकानदार, शिक्षणाधिकारी सुभाष वराडे, महिला व बाल कल्याण अधिकारी रामरामे यांचेसह आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व महिला बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.