डॉ. श्रीनिवास कुलकर्णी

1

कोल्हापूर ते कॅलिफोर्निया असा रंजक प्रवास करणारे खगोलशास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांना नुकतेच त्यांच्या संशोधनाबद्दल तेल अविव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाऊंडेशनच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. एक कोटी डॉलर आणि मानपत्र असे त्याचे स्वरूप होते. कोल्हापूरमधील कुरुंदवाड येथे जन्मलेले डॉ. कुलकर्णी यांचे संशोधन खगोलभौतिकात मान्यताप्राप्त झाले आहे. सध्या ते कॅलिफोर्नियातील इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) या संस्थेत ग्रहविज्ञानाचे प्राध्यापक आहेत. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचे ते बंधू आहेत. यांचे आईवडील व्यवसायाने डॉक्टर असले तरी कुलकर्णी यांनी मात्र संशोधनाची आवड जोपासली. त्यांचे शिक्षण हुबळी येथे झाले. दिल्लीच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी १९७८ साली भौतिकशास्त्र एमएस पदवी घेतली.२५ वर्षांपूर्वी ते पीएच. डी. करण्यासाठी या संस्थेत गेले. नंतर १९८३ मध्ये डॉक्टरेट झाल्यानंतर याच विद्यापीठात ते प्राध्यापक झाले. इंटरस्टेलर मेडियम पल्सार, ब्राऊन ड्वार्फ, सॉफ्ट गॅमा रे रिपीटर्स, गॅमा किरणांचे स्फोट, ऑप्टिकल ट्रान्झियंटस् हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. विस्तृत तरंगलांबी निरीक्षणांच्या मदतीने त्यांनी आकाशगंगेचा अभ्यास केला. डोनाल्ड बॅकर यांच्यासमवेत त्यांनी पहिला मिली सेकंड पल्सर शोधला. त्यावेळी ते पदवीधर होते. काल्टेकमध्ये मिलिकन फेलो असताना त्यांनी पहिल्या ग्लोब्युलर क्लस्टर पल्सरचा शोध लावला. डेल फ्रेल व तोशियो मुराकामी यांच्यासमवेत केलेल्या संशोधनात त्यांनी असे दाखवून दिले की, सौम्य गॅमा किरण रिपीटर्स हे सुपरनोव्हाच्या अवशेषांशी निगडित न्यूट्रॉन तारे असतात. त्यांचे चुंबकीय क्षेत्र खूप उच्च असते. १९९४ मध्ये काल्टेकच्या चमूने ब्राऊन ड्वार्फ गिलीज २२९ ताऱ्याभोवती शोधला. त्यात कुलकर्णी यांच्या संशोधनाचे योगदान मोठे आहे. पॅलोमार ट्रान्सिएंट फॅक्टरी म्हणजे रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करणाऱया यंत्रणेतून अतिप्रकाशमान नवतारा, कॅल्शियम संपृक्त नवतारा व प्रकाशमान लाल नवतारा यांचे संशोधन ते करीत असून त्यांनी ऑप्टिकल ट्रान्सिएंटचे नवे गट शोधले आहेत. रॉयल सोसायटी ऑफ लंडन, युनायटेड स्टेटस् ऍकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल नेदरलॅण्डस् ऍकॅडमी ऑफ आर्टस् ऍण्ड सायन्सेस या चार नामांकित संस्थांचे ते सदस्य आहेत.