डॉ. तात्या लहाने… सिनेमा ६ ऑक्टोबर रोजी होणार प्रदर्शित


सामना ऑनलाईन । मुंबई

डॉ. तात्याराव लहाने यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा “डॉ. तात्या लहाने … अंगार पॉवर इज विदीन” हा सिनेमा ६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून डॉ. लहाने यांची निव्वळ बायोपिक सादर केली नसून त्यांच्या आयुष्याची कथा हा सिनेमा पाहणारी प्रत्येक व्यक्ती स्वतः अनुभवेल अशी आहे.

नामवंत कलाकारांचा कसदार अभिनय आणि डॉ. लहाने यांचं आयुष्य पालटवणारा क्षण हृदय हेलावून टाकणारा आहे. सिनेमात डॉ. लहाने यांची भूमिका अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी तर त्यांच्या आईची भूमिका अभिनेत्री अलका कुबल यांनी साकारली आहे.

दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे मृत्यूच्या दाराशी उभ्या असलेल्या आपल्या मुलाला स्वतःची किडनी देऊन पुन्हा नवा जन्म देणारी डॉक्टरांची आई अंजनाबाई यांच्या भूमिकेतून अलका कुबल यांचा अभिनय पाहण्याची संधी बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना मिळणार आहे. आई-मुलाची ही हृदयस्पर्शी सत्य घटना खूप प्रेरक आहे. डॉ. लहाने यांना नवा जन्म देणारी त्यांची आई ही त्यांच्या आयुष्यातील मोठे प्रेरणा स्थान आहे.

“डॉ. तात्या लहाने … अंगार पॉवर इज विदीन” सिनेमाचे दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले असून त्यांच्याच चक दे प्रॉडक्शन अंतर्गत सिनेमाची निर्मिती केली आहे. मकरंद अनासपुरे आणि अलका कुबल यांच्यासोबत सिनेमात निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.