‘डॉ. तात्या लहाने’ चित्रपटासाठी ३०० गायक गाणार गाणे

सामना ऑनलाईन, मुंबई

‘डॉ. तात्या लहाने… अंगार पॉवर इज विदीन’ या चित्रपटात १०८ शब्दांचे “काळोखाला भेदून टाकू… जीवनाला उजळून टाकू” हे गाणे रिले सिंगिंग पद्धतीने ३०० गायक एकाच लयीत-सूरात गाणार आहेत. मूळ गीत विराग यांनी शब्धबद्ध केलं असून सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्या साथीने गायले आहे. ‘एक हिंदुस्थानी’ या संगीतकाराने हे गाणे कंपोझ केले आहे. प्रमोशनसाठी हे गाणे रिले सिंगिंग पद्धतीने सादर केले जाणार आहे.

रिले सिंगिंग २००६ मध्ये इंग्लंडमधील जॉन बॅल स्कूलमध्ये २८८ विद्यार्थ्यांनी केले होते. याआधी २०१४ मध्ये संतोष रुंगटा इन्स्टिट्यूट, राजस्थान मध्येही रिले सिंगिंग झाले होते. मात्र चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिले सिंगिग देशात पहिल्यांदाच वापरले जात आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग मराठी चित्रपटासाठी होत आहे.

विराग मधूमालती वानखडे यांनी हा प्रयोग यशस्वी करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. रिले सिंगिंगच्या प्रयोगाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी विराग प्रयत्नात आहेत. नेत्रदान मोहिमेसाठी त्यांनी १०० दिवस डोळ्यांवर पट्टी बांधण्याचा देखील विक्रमी उपक्रम केला होता. कलर्स वाहिनीवर “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अब तोडेगा इंडिया”च्या माध्यमातून १५५ तबला वादकांसोबत सातत्याने दीड मिनिटं एकाच सूरात तबला वादनाचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे. या तबला वादनाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याने आता रिले सिंगिंग देखील यशस्वी होईल असा त्यांना ठाम विश्वास आहे. या उपक्रमासाठी सध्या मुंबईत ऑडिशन्स सुरु आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत त्या सुरु राहतील. आतापर्यंत ५०० उत्स्फूर्त स्पर्धकांनी या उपक्रमासाठी ऑडिशन्स दिल्या आहे. मुंबईत होत असलेल्या आणि पुणे नाशिक सोबत मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात होणाऱ्या ऑडिशन्स मधून निवडक ३०० गायक या कलाकृतीचे साक्षीदार होणार आहेत. ‘चक दे’ प्रॉडक्शन निर्मित ‘डॉ. तात्या लहाने… अंगार पॉवर इज विदीन’ या मराठी सिनेमाचे विराग निर्माता आणि दिग्दर्शक आहेत.