मुद्दा : गणेशोत्सव आणि पर्यावरणवादी

>>डॉ. उदय धुरी<<

गणेशोत्सवाचे पडघम आता वाजू लागले आहेत. गणरायाच्या स्वागतासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना हिंदू जनतेच्या या उत्सवासंदर्भात होत असलेल्या अपप्रचाराला हिंदूंनी बळी पडू नये. गणेशोत्सवाची चाहूल लागताच आपणा सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी आपण एकत्रितपणे सिद्धतेला लागतो. सध्याच्या काळात स्वतःला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे स्वयंघोषित सुधारक गणेशोत्सवाच्या काळात सक्रिय होतात. गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम या लोकांनी काही वर्षांपूर्वी काढली होती. गेल्या 2-3 वर्षांपासून इको-फ्रेंडली गणेश या गोंडस नावाखाली कागदी लगदा अथवा तत्सम वस्तूंपासून गणेशाची मूर्ती बनवा अशाप्रकारे प्रचार केला जात आहे. हे कथित पर्यावरणप्रेमी ज्या कागदी लगद्याच्या मूर्तीचा पुरस्कार करतात, त्याने किती प्रदूषण होते, हे प्रत्येकाने जाणणे आवश्यक आहे. मुंबईतील प्रसिद्ध शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्था (Institute of Chemical Technology Mumbai) यांनी कागदी लगद्यापासून बनवलेल्या चार मूर्ती घेऊन या विषयाचे संशोधन केले. त्यांनी सांगितले, 10 किलो कागदी मूर्तीमुळे 1 हजार लिटर पाणी प्रदूषित होते. त्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅड्मियम, टायटॅनिअम ऑक्साईड असे विषारी धातू आढळून आले. सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन या संस्थेने साधा कागद डिस्टील्ड वॉटरमध्ये टाकून संशोधन केले. कागद विरघळवलेल्या या पाण्यात ऑक्सिजनची मात्रा शून्यावर आल्याचे त्यांच्या प्रयोगात स्पष्ट झाले. हे अत्यंत घातक आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषद यांच्या क्षेत्रात प्रतिदिन निर्माण होणारे सांडपाणी, त्यावर केली जाणारी प्रक्रिया आणि तिची विल्हेवाट यांविषयी शासनाने फेब्रुवारी 2014 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालानुसार प्रतिदिन 6 अब्ज 21 कोटी 3 लक्ष लिटर सांडपाण्याची निर्मिती होते. त्यापैकी केवळ 3 अब्ज 63 कोटी 86 लक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजेच प्रतिदिन 2 अब्ज 57 कोटी 17 लाख लिटर एवढे सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता जसेच्या तसेच नद्या किंवा खाडय़ा यांत सोडले जाते. ही आकडेवारी केवळ शहरी भागांतील आहे. तसेच महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रांतील कारखान्यांतून रसायनयुक्त सांडपाणी जवळच्या नद्या किंवा खाडय़ांमध्ये जसेच्या तसे सोडले जाते. त्यामुळे होणारी प्राणी आणि वनस्पती यांची जीवितहानी स्वयंघोषित समाजसुधारक आणि पर्यावरणवादी यांना का दिसत नाही? पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली नव्हे, तर पर्यावरणद्वेषासह केवळ हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरांना खंडित करण्यासाठी पुरोगामी मंडळींचा कागदी लगदा अथवा तत्सम वस्तूंपासून बनवलेल्या मूर्तीचा पुरस्कार हा निवळ खोटेपणा असल्याचे आपण लक्षात घ्यायला हवे. गणेशमूर्ती ही धर्मशास्त्रानुसार शाडूच्या मातीपासून बनवणे अपेक्षित आहे. अशी मूर्तीच शंभर टक्के पर्यावरणपूरक अर्थात खऱ्या अर्थाने इको-फ्रेंडली असते. एकूणच काय, तर धर्मशास्त्रविरोधी कृती समाजात रूढ होऊ न देणे, हे जाणून पुरोगाम्यांच्या विरोधात सनदशीर आणि संघटितपणे चळवळ उभी करायला हवी. तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांचे अज्ञान घालवून त्यांच्यात वैचारिक सुस्पष्टता निर्माण होणे, हीसुद्धा काळाची आवश्यकता आहे. हिंदूंचे प्रबोधन आणि पुरोगाम्यांना खडसवणे हीसुद्धा गणेशाची उपासनाच आहे.