डॉ. वि. म. शिंदे

2

रत्नागिरी जिह्यात वैद्यकीय क्षेत्रामध्ये जुन्या काळापासून फॅमिली डॉक्टर म्हणून परिचित असलेले डॉ.वि.म.शिंदे यांनी वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. नुकतेच त्यांचे निधन झाले. शिंदे कुंटुबीयांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मोठा प्रभाव होता. डॉ. वि. म. शिंदे यांचे वडील म. ग. शिंदे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरीतील एक सहकारी होते. पतितपावन मंदिराच्या अनेक उपक्रमात त्यावेळी शिंदे कुंटुबांचा सहभाग असायचा. त्यावेळी जातीभेद नष्ट करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंक समारंभ,व अन्य उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. डॉ. वि. म. शिंदे हेसुद्धा सावरकरांचे अनुयायी होते. त्यांनी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले. वाचनालयाचे अध्यक्ष असताना रत्नागिरीत १९९० मध्ये अखिल भारतीय सहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरीतील पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्षपददेखील त्यांनी अनेक वर्षे सांभाळले. कोकण मराठी साहित्य परिषद स्थापनेमध्ये पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांबरोबर डॉ. वि. म. शिंदे यांचा मोठा वाटा आहे. कोकणातील साहित्यिकांना एक व्यासपीठ मिळवून देण्याची त्यांची एक धडपड होती. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक उभारण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. अनेक शिक्षणसंस्थाच्या मदतीकरिता त्यांनी पुढाकार घेतला.