‘सत्यम् शिवम् सुंदरम्’: जीवनाची त्रिसूत्री

3

>> डॉ. विजय पांढरीपांडे   

आपल्या संस्कृतीचे सर्वोत्कृष्ट बोधवचन म्हणजे ‘सत्यम् शिवम् सुंदरम.’ जीवन कसे असावे, कसे जगावे याचे सार या त्रिसूत्रीत सामावले आहे. सत्याचा संबंध बुद्धीशी, विवेकाशी. काय योग्य, काय अयोग्य हे पारखणार्‍या शिवमचा संबंध पावित्र्याशी, शुद्धतेशी, तसेच अचूकतेशीदेखील. शास्त्राने सिद्ध करता येईल अशी  प्रणाली. सुंदर म्हणजे आकर्षित करणारे, पुनः पुन्हा अनुभवावेसे वाटणारे. ज्यात कृत्रिमता नाही असे नैसर्गिक, निसर्गाशी जवळीक साधणारे. आपण साधारणपणे निसर्गाच्या विरोधात जाऊ शकत नाही. कारण ते स्वयंसिद्ध असते. तेव्हा ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ ही त्रिसूत्री आपण ध्यानात ठेवली, अंगिकारली तरी खूप काही साध्य होऊ शकते.  

माझ्या आयुष्याच्या सात दशकांपैकी चार दशकांपेक्षाचा अधिक काळ हा अध्ययन, अध्यापन, संशोधनात गेला. ज्या विद्यापीठाने गेल्या वर्षी शतक महोत्सव साजरा केला त्या उस्मानिया विद्यापीठात मी प्राध्यापक (फुलटाइम प्रोफेसर) या नात्याने अर्धेअधिक आयुष्य योगदान दिले याचा मला अभिमान वाटतो. इथे (हैदराबादला) येण्यापूर्वी आयआयटीत घालवलेले एक दशक हा माझा खर्‍या अर्थाने पायाभरणीचा जडणघडणीचा काळ. तिथल्या भीष्मपितामहांच्या मार्गदर्शनाखाली गिरविलेले धडे पुढे आयुष्यभर उपयोगी पडले. मैलाचे दगड ठरले. आयुष्यात सर्वार्थाने यशस्वी होण्यासाठी परिश्रमाला, प्रामाणिक प्रयत्नांना कुठलाही पर्याय नाही हे मला आयआयटीच्या महागुरूंनी शिकविले. त्यांचे ऋण शब्दांपलीकडचे.

उत्तम शिक्षक होणे ही एक तपश्चर्या असते, साधना असते. ज्या मायक्रोवेव्ह अन् रडार इंजिनीअरिंगमध्ये मी तीनचार दशके अध्यापन अन् थोडेफार संशोधन केले, त्या विषयाचा आयआयटीत पाऊल ठेवण्यापूर्वी मला फारसा गंध नव्हता. त्यामुळे या विषयाचे थिअरी अन् प्रयोगाचे सर्व पायाभूत धडे आयआयटीच्या भीष्मपितामहांनी माझ्याकडून गिरवून घेतले. एखाद्या संगीत घराण्यात गायनाचार्य पंडित जशी नवख्या शिष्याकडून एखादी चीज अनेक वेळा घोकून घेतात, त्या पद्धतीचे गुरुशरण शिक्षण मला लाभले. अशा साधनेला फार पेशन्स लागतो, तपश्चर्या लागते. हे अक्षरशः लोखंडाचे चणे खाण्यासारखे दिव्य असते. आजच्या पिढीत बहुतांशी प्रमाणात, हा पेशन्स, ही तपश्चर्या आढळून येत नाही. या विधानाला अपवाद आहेतच, पण ती संख्या फार कमी परिश्रमाला पर्याय नाही हे नव्या युवा पिढीने समजून घेतले पाहिजे.

तुमचे शिक्षण, तुम्हाला लाभलेले शिक्षक, ज्या वातावरणात तुमची वाढ होते ती संस्था, तो परिसर, तुमची साथसंगत, तुमचे वाचन या सर्वांतून लाभलेले संस्कार हेच तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी कारणीभूत असतात. मी ज्या संस्थेत खर्‍या अर्थाने घडलो, त्या आयआयटी खरगपूरचे नाव सर्वप्रथम अभिमानाने सांगतो. त्या संस्थेच्या तेथील ऋषीतुल्य प्राध्यापकांच्या आठवणीने आजही भारावून भरभरून बोलतो.

आयआयटी खरगपूरनंतर ज्या उस्मानिया विद्यापीठात माझ्या संशोधनात खर्‍या अर्थाने चालना मिळाली, माझ्या अध्यापनाला गती मिळाली त्या विद्यापीठाचे तेथील ज्येष्ठ सहकाऱयांचे ऋण मानताना मी विनम्र होतो, भावविवश होतो. आपण घेण्याचा विचार करण्याआधी देण्याचा विचार केला पाहिजे. मग आपल्या योग्यतेनुसार आपल्याला हवे ते वेळेवर, किंबहुना वेळेआधीसुद्धा मिळतेच. मला ते मिळाले यासाठी माझ्या मनात नेहमीच कृतज्ञ भाव आहे.

आपण आपले काम निष्ठेने, श्रद्धेने करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे. कुठेही ‘चलता है’ टाईप कॅज्युअल अप्रोच नको. मी जे काही करीन ते उत्कृष्टच करीन हा गुणवत्तेविषयीचा आग्रह फार महत्त्वाचा असतो.

यश संपादनाच्या दृष्टीने आपण अनेकदा निवड करताना आपली व्यक्तिगत सोय बघतो, सोपा मार्ग निवडतो हे चुकीचे. सोयीपेक्षा, सोपेपणापेक्षा योग्य मार्ग कोणता हा विचार जास्त योग्य. म्हणजे कन्व्हिनियंट चॉईसपेक्षा राईट चॉईस महत्त्वाचा.

आजकाल खोटेपणा केल्याशिवाय, वाकडी वाट चालल्याशिवाय काही मिळत नाही हा प्रवाद वाढीला लागलाय. यासाठी राजकारणी पुढाऱयांची (लज्जास्पद) उदाहरणं दिली जातात. ते वाममार्गाने वर चढले, धनवान झाले हे खरे असले तरी ते सुखीसमाधानी आहेत का? हा प्रश्न आहे.

आपल्या कार्यकर्तृत्वाचे समाधान हेच शाश्वत सुख असते. खोटेपणाने सत्तासंपत्ती कमावणारी माणसे नेहमी तणावग्रस्त असतात. त्यांच्या मनात कुठेतरी भीती असते. कोण कधी काय उकरून काढेल या विचाराने ते भयग्रस्त असतात. शिवाय वाममार्गाने मिळालेले यश पचवायला कठीण असते. ते उलट तुमच्या आत्मविश्वासाला पोखरणारे असते, तुम्हाला आतून दुबळे करणारे ठरते.

आपल्या संस्कृतीचे सर्वोत्कृष्ट बोधवचन म्हणजे ‘सत्यम् शिवम्    सुंदरम.’ जीवन कसे असावे, कसे जगावे याचे सार या त्रिसूत्रीत सामावले आहे. सत्याचा संबंध बुद्धीशी, विवेकाशी. काय योग्य, काय अयोग्य हे पारखणार्‍या शिवमचा संबंध पावित्र्याशी, शुद्धतेशी, तसेच अचूकतेशीदेखील. शास्त्राने सिद्ध करता येईल अशी अचूक, वैचारिक प्रणाली. सुंदर म्हणजे आकर्षित करणारे, पुनः पुन्हा अनुभवावेसे वाटणारे. ज्यात कृत्रिमता नाही असे थोडक्यात नैसर्गिक, निसर्गाशी जवळीक साधणारे. आपण साधारणपणे निसर्गाच्या विरोधात जाऊ शकत नाही. कारण ते स्वयंसिद्ध असते. तिथे वेगळय़ा प्रमाणाची, सिद्धतेची गरज नसते.

तेव्हा ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ ही त्रिसूत्री आपण ध्यानात ठेवली, अंगिकारली तरी खूप काही साध्य होऊ शकते. कुणीही शत-प्रतिशत परफेक्ट असू शकत नाही, होऊ शकत नाही, पण आपण त्या दिशेने प्रयत्न मात्र करू शकतो.

इंजिनीअरिंगच्या अध्यापन संशोधनाच्या सोबतीने, चांगल्या साहित्याने, उत्तम वाचनाने अन् लेखनाच्या छंदानेदेखील मला खूप काही दिले, शिकवले. सर्वार्थाने श्रीमंत, समृद्ध केले. वाचन-लेखनाच्या छंदामुळे मला इंजिनीअरिंगच्या सोबतीने माणसांचादेखील अभ्यास करता आला. चुकांकडे शिकण्याची संधी म्हणून बघण्याचा दृष्टिकोन मिळाला. काय करावे याबरोबर काय करू नये ही जाणदेखील तितकीच महत्त्वाची, किंबहुना जास्त महत्त्वाची. आयुष्याचे गणित आपण समजतो तितके कठीण नसते. इंजिनीअरिंगच्या शिक्षणात प्रत्येक समस्येचे उत्तर असतेच. एक नव्हे, अनेक उत्तरे. आपण आपल्याला योग्य ते उत्तर शोधायचे!

[email protected]