डॉ. विलास पाध्ये

2

>>ऍड. प्रतीक राजूरकर<<

गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्र शिक्षण सेवेत मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून डॉ. विलास पाध्ये संभाजीनगर आणि सध्या कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आपल्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीच्या आधारावर महाराष्ट्र शासनाचा प्रशासन विभागातील अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता परितोषिकाने २००६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला. मानसशास्त्र विषयातील ‘मानसशास्त्र एक परिचय’ २००४ साली आणि ‘आधुनिक सामान्य मानसशास्त्र’ या त्यांच्या दोन पुस्तकांचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आणि मानसशास्त्र विषयात रुची असलेल्या सामान्य वाचकांनी दोन्ही पुस्तकांना दिलेला प्रतिसाद पाध्ये यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे महत्त्व निर्देशित करतात.

विलास पाध्ये यांनी प्राध्यापक म्हणून कार्य करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानसशास्त्र संबंधित चार महत्त्वपूर्ण परिषदेत सहभाग घेतला असून त्यांचे जवळपास दहा लेख आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधित पुस्तकात प्रकाशित झाले आहेत. या व्यतिरिक्त १५ हजार विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन “Teacher assessnent by students in urban centres in Maharashtra” या विषयावर त्यांनी सादर केलेल्या शोधप्रबंधावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने त्यांना २०१२ साली शिक्षण क्षेत्रातील मानाची पीएच.डी. पदवी देऊन गौरव केला. मानसशास्त्राव्यतिरिक्त संख्याशास्त्र, संशोधन कार्यप्रणाली, विषयावरील शिबिरात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे, विविध माध्यमांकडून आयोजित केलेल्या उपक्रमात त्यांना सामाजिक, शैक्षणिक, विद्यार्थी संबंधित विषयांवर मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित केल्या गेले जाते.

मूळचे अमरावतीचे असलेले विलास पाध्ये हे लोकमान्य टिळकांचे अत्यंत विश्वासू साथीदार दादासाहेब खापर्डे यांचे पणतू, त्यांचे आई वडील अमरावती शासकीय महाविद्यालयात प्राध्यापिका आणि प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. प्रतिष्ठत कुटुंबातून मिळालेल्या शिक्षण क्षेत्रातील वारसा कायम ठेवत विलास पाध्ये यांनी शासकीय सेवेत पदार्पण केले, पण अमरावती येथील निसर्गाचे वैभव असलेल्या मेळघाटच्या जंगलाने निसर्गाची आवड निर्माण केली होती, निसर्गभ्रमंती, व्याघ्र गणना, पक्षी निरीक्षण, संवर्धनसारख्या विषयातील सहभाग संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर प्राधान्यतेमुळे दुय्यम झाला, पण ओढ कायम होती. आपले नोकरीतील कर्तव्य योग्यपणे पार पाडून संवर्धन क्षेत्रात कार्य करण्याचे ध्येय घेऊन अनेक वर्षांनी या कार्यात स्वतःचा वाटा उचलण्याचा संकल्प करून गेल्या दोन वर्षांपासून व्याघ्र आणि निसर्ग संवर्धन कार्यात त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. स्वतः मानसशास्त्र विषयात पारंगत असल्याने संवर्धन क्षेत्रात शिक्षणाच्या दृष्टीने लहान वयातील मुलांपर्यंत तो संदेश पोहचविण्यासाठी त्यांनी ऑनिमेशन फिल्मच्या प्रभावी माध्यमातून स्वखर्चाने स्वतः कथा, पटकथा, दिग्दर्शन करून, वेबेक स्टुडिओ यांचेमार्फत नियाल परमार, प्रतीक सोळंकी, नीता रावलजी यांच्या सहकार्याने सात मिनिटांची एक ऑनिमेशन फिल्म बनवली, लहान मुलांना बहुतांशी वाघ हा क्रूर, ठार मारणारा शत्रू असाच आजवर चित्रित झाला आहे. वाघाची ती ओळख पुसण्यासाठी वाघाच्या मनातील विचार, वाघांचे संवर्धन, मानवाचे आयुष्य जरी बहुतांशी जंगलापासून दूर असले तरी त्यांचे महत्त्व याचे चित्रण ‘बॉबी’ नावाच्या वाघाच्या बछडय़ाच्या माध्यमातून साकारले आहे, जे प्रत्येक वयातील व्यक्तीला विचार करण्यास भाग पाडते. त्या कथेला ‘लेट्स सेव्ह बॉबी’ असे साजेसे नाव देऊन त्याचे एक टिझर जागतिक व्याघ्र दिनानिमित्त यू टय़ुब https://www.youtube.com/watch?v=KFGtMo६९p०s आणि फेसबुक वर ‘लेट्स सेव्ह बॉबी’ या पेजवर प्रदर्शित केले आहे. ऑक्टोबर २०१७ पर्यंत ‘लेट्स सेव्ह बॉबी’ ही सात मिनिटांची ऑनिमेटेड फिल्म व्याघ्र संवर्धनाचा सूचक संदेश घेऊन आपल्यापर्यंत पोहचेल. एका मानसशास्त्राच्या शिक्षकाच्या संकल्पनेतून वाघांच्या मनातले विचार मानवापर्यंत पोहचल्यावर आपल्यातील प्रत्येकाला समाजाबरोबर आपण निसर्गाचेसुद्धा देणे लागतो याचा विचार करायला भाग पाडेल आणि प्रत्येकाला निसर्ग संवर्धनातील आपला खारीचा वाटा उचलण्यास प्रवृत्त करेल.