वांद्रे ते दहिसर नालेसफाई जोरदार! महापौरांनी दिली सरप्राइज व्हिजिट

सामना प्रतिनिधी । मुंबई

वांद्रे ते दहिसरपर्यंतची नालेसफाई सध्या जोरदार सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ४० टक्के काम पूर्णही झाले आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बुधवारी वांद्रे ते थेट दहिसरपर्यंतच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी सरप्राइज व्हिजिट देऊन केली. पावसाळ्याआधी नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. नालेसफाईबद्दल समाधान व्यक्त करताना यावर्षी मुंबईकरांना पाणी तुंबण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावर्षी पावसाळा दरवर्षीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पावसाळ्यात कोणताही त्रास सहक करावा लागू नये यासाठी महापौर महाडेश्वर यांनी पत्रकारांसह पश्चिम उपनगरातील नालेसफाईची पाहणी केली. या पाहणी दौर्‍यात मिठी नदी-वाकोला नाला, ईर्ला नाला अंधेरी, ओशिवरा नदी नाला, पिरामल नाला, लालजीपाडा व बर्ड आय व्हिव लिंक रोड नाला, धरखाडी नाला, पोयसर नदी, पुष्पापार्क नाला अशा ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, स्थापत्य समिती अध्यक्षा साधना माने, नगरसेवक सदानंद परब, राजू पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, हर्षद कारकर, नगरसेविका योगिता भोईर, रिद्धी खुरसुंगे, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अधिकारी विद्याधर खणकर आदी उपस्थित होते.

… तर ठेकेदारावर कारवाई
मिठी नदी व वाकोला नाला, वांद्रे पूर्व येथून नालेसफाई कामाच्या पाहणीला सुरुवात करण्यात आली. या ठिकाणचे काम समाधानकारक असल्याचे निदर्शनास आले. तर महाराष्ट्र नगरमध्ये मात्र नालेसफाई सुरूच झाली नसल्याचे दिसले. त्यामुळे येत्या दहा दिवसांत हे काम पूर्ण करा असे आदेश देतानाच दहा दिवसांनंतर पुन्हा सरप्राइज व्हिजिट देऊन पाहणी करणार असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी जर नालेसफाई झालेली दिसली नाही तर ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. नालेसफाईच्या कामात कुचराई करणार्‍या ठेकेदारांना ताबडतोब नोटीस पाठवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

जनजागृती व्हायला हवी
नालेसफाईची पाहणी सुरू असतानाच काही ठिकाणी रहिवासी नाल्यांमध्ये थेट कचरा टाकताना, तर काही ठिकाणी शौचास बसल्याचे दिसत होते. त्यामुळे मुंबईला जर खर्‍या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर बनवायचे असले तर जनजागृती आवश्यक असल्याचे मत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी व्यक्त केले. शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्लॅस्टिकबंदी प्रभावीपणे राबवल्यास आणि प्रत्येक मुंबईकराने जबाबदारीने वागल्यास नालेसफाईचे काम आपोआप अर्ध्याने कमी होईल असे मतही त्यांनी व्यक्त केले.

फॉर्म्युला बदलला
प्रत्येक वर्षी पावसाळ्याआधी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के तर पावसाळ्यानंतर २० टक्के नालेसफाई केली जात होती. मात्र आता पावसाळ्याआधी ७० टक्के, पावसाळ्यात १५ टक्के आणि पावसाळ्यानंतर १५ टक्के नालेसफाई केली जाणार आहे. त्यामुळे नालेसफाई वेगाने झाल्याने मुंबईकरांना पाणी तुंबण्याचा त्रास होणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पालिकेमार्फत नालेसफाईचे काम समाधानकारकरीत्या सुरू आहे. मात्र मेट्रो, मोनो, म्हाडा, रेल्वेसह राज्य सरकारच्या प्राधिकरणांनी पालिकेची परवानगी न घेता काम केल्यामुळे पालिकेच्या पर्जन्यजलवाहिन्या, मलनिस्सारण, पाण्याच्या वाहिन्या फुटल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. या कारणांमुळे जर मुंबईत पाणी तुंबल्यास त्याला राज्य सरकारच जबाबदार राहील.
– विश्वनाथ महाडेश्वर, महापौर