गटारातील सांडपाणी पनवेलकरांच्या नळाला; आरोग्याचा प्रश्न गंभीर

2

सामना प्रतिनिधी । पनवेल

गेले चार दिवस सुरू असलेली कचराकोंडी सुटते न सुटते तोच पनवेलकरांना आता सांडपाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मंगळवार सकाळपासून शहरातील काही भागात घरातील नळांमधून गटारातील सांडपाणी येऊ लागल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. तात्पुरता उपाय म्हणून पालिकेने या विभागातील मुख्य जलवाहिनी बंद ठेवली आहे. पिण्याच्या पाण्यातूनच सांडपाणी येऊ लागल्याने आम्ही पाणी न पिताच तडफडून मरायचे की काय, असा संतप्त सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे.

पनवेल शहरातील पंचरत्न हॉटेल ते उरण नाका रोडवरील गुलरेज, गुरमर्ग, गुलमोहर तसेच ओम सदनिका या सोसायट्यांच्या पाण्याच्या नळातून गेले दोन दिवस गटारातील सांडपाणी येऊ लागले आहे. त्यामुळे या सोसायट्यांच्या घराघरांत दुर्गंधी पसरली आहे. मंगळवारी सकाळपासून हे सांडपाणी घराघरांत येऊ लागल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. घरात दुर्गंधी कोठून येते हेच आधी समजून येत नव्हते. मात्र नंतर नळाद्वारे सांडपाणी येत असल्याचे लक्षात येताच नागरिक हवालदिल झाले आहेत. पालिकेने तातडीने या सांडपाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

सांडपाणी येत असलेल्या भागात पालिका कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली आणि मुख्य जलवाहिनी बंद केली आहे. कोणत्या ठिकाणातून हे सांडपाणी नळ पाण्यात मिसळत आहे ते पाहून लवकरच या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्यात येईल. सध्या या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
– संध्या बावनकुळे, उपायुक्त, पनवेल महापालिका.