मालवणात सार्वजनिक विहिरीत दुर्गंधीयुक्त सांडपाणी

69

 

सामना प्रतिनिधी । मालवण

शहरातील बांगीवाडा भागातील मालवण नगरपरिषद कर्मचारी वसाहत येथील सार्वजनिक विहिरीत दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे झरे वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही कार्यवाही अथवा उपाययोजना अद्याप झाल्या नाहीत. तरी दोन दिवसात समस्या मार्गी न लागल्यास कर्मचारी कुटुंबियांसह पालिकेवर धडक देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विहिरीतील सांडपाणी प्रश्नी कर्मचारी कुटुंबीयांनी तात्काळ सोडवण्याची मागणी नगरसेवक यतीन खोत यांचे लक्ष वेधत केली. कर्मचारी वसाहत येथे सुमारे २४ कुटुंबं राहतात. काही महिन्यांपूर्वी वसाहतीतील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार व चेंबर उभारणी करण्यात आली. यातील एक चेंबर विहिरीच्या बाजूला असून नादुरुस्त अथवा दर्जाहीन चेंबरमुळे सांडपाणी जमिनीत झिरपून ते विहिरीत जात असावे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दोन दिवस मोठ्या प्रमाणात सांडपाण्याची गळती दिसून आली.

तात्काळ उपाययोजना करा… 

सांडपाणी वाहक गटार व चेंबर उभारणी ज्या ठेकेदाराने केली त्याला पाचारण करत संपूर्ण प्रकार निदर्शनास आणून दिला. नेमके सांडपाणी येते कुठून ते तपासावे. तसेच चेंबर नादुरुस्त असल्यास तत्काळ चेंबर दुरुस्ती करून सांडपाण्याची गळती थांबवावी. तसेच विहिरीचे अशुद्ध पाणी उपसा करून शुद्ध पाण्याचा पुरवठा पूर्वीप्रमाणे करून घ्यावा. अश्या सूचना ठेकेदारास दिल्या.

तोपर्यंत पाणीपुरवठा करणार… 

कर्मचारी वसाहत येथे धामापूर नळपाणी योजनेचे पाणी येते. मात्र ते पुरेसे नसते, काही वेळा पाणी बंद असते. तर सार्वजनिक विहिरीचे पाणी कपडे, भांडी, आंघोळ यासाठी वापरले जाते. तसेच आवश्यक वेळी पिण्यासाठीही वापर होतो. मात्र पाणी दूषित बनल्याने कर्मचारी कुटुंबीयांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या