स्त्री भ्रूणहत्येवरील नाटक विनामूल्य

सामना प्रतिनिधी । मुंबई 

नाटक हे माध्यम मनोरंजनासोबत प्रबोधनात्मकही असते. स्त्री भ्रूणहत्या हा आजचा ज्वलंत प्रश्न. त्यासाठी ‘तू है मेरी किरन’चे दोन प्रयोग विनामूल्य करण्यात आले.

स्त्री भूणहत्या हा विषय खरं तर किचकट… आणि सहसा त्यावर कुणी बोलत नाही… पण ते विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न ‘तू है मेरी किरन’ या नाटकाचे दिग्दर्शक प्रवीण आंग्रे यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल दोन प्रयोग अक्षरशः मोफत दाखवले. समाजासाठी आपण देणं लागतो ही बांधिलकी त्यांनी जपली आहे.

‘तू है मेरी किरन’ या नाटकाबद्दल बोलताना दिग्दर्शक आंग्रे पुढे म्हणाले की,स्त्रीभ्रूण हत्या हा विषय सहसा नाटक वा सिनेमात आलेला नाही. येत नाही. आला तरी तो मारून मुटकून ‘असं करू नका’ हे पटवून देण्यासाठी घेतला गेला. पण आमच्या नाटकातून तो नकळत प्रेक्षकांना कळतो, पटतो. त्याविषयी जास्त काही वेगळं न सांगता कथानकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना स्त्री भ्रूण हत्या कशी वाईट ते पटवून दिलं जातं. नाटक संपल्यावर त्याचा उद्देश्य हा असल्याचं कळतं तेव्हा प्रेक्षक चकित होतात. वास्तविक हे नाटक रहस्यमय आहे. त्यामुळे त्याच्या कथानकाबद्दल जास्त काही मी सांगणार नाही. पण आतापर्यंत या नाटकाला खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे नाटक त्यांनी अनेक स्पर्धांमध्येही पाठवले होते. नाटक राज्य नाटय़ स्पर्धेत आणि कामगार कल्याण स्पर्धेत पाठवले होते. तेथेही नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. तरीही आत्ताच त्यांनी या नाटकाचे दोन प्रयोग पूर्णपणे मोफत ठेवले होते. दिग्दर्शक आंग्रे पुढे म्हणाले की, नाटकाचा नायक उच्चशिक्षित असूनही त्याचे विचार पाहून प्रेक्षक हेलावून जातात. नाटक संपल्यावर प्रेक्षक एक नवा विचार घेऊन नाट्यगृहाच्या बाहेर पडतात… आणि तोच आमचा मुख्य हेतू आहे. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने हे नाटक पाहायला हवे. कारण नाटकाचा विषयच आम्ही वेगळ्या पद्धतीने घेतला आहे आणि त्याला विनोदाची झालर लावली आहे. एखादे नाटक समाज बदलवू शकते हे मला या नाटकाद्वारे दाखवून द्यायचे आहे. स्त्राr भ्रूण हत्या करणाऱया काही डॉक्टरांनी तर आपापली दुकानंच थाटलेली आहेत. अनेक शहरात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. मुलगी नको म्हणून गर्भपात करणाऱया पालकांची संख्याही वाढतेच आहे. हे थांबले पाहिजे, असेही दिग्दर्शक प्रवीण आंग्रे यांनी अखेरीस स्पष्ट केले.

मोफत प्रयोग
स्त्री भ्रूणहत्या हा विषय लोकांपर्यंत पोहोचण्याची आज खरी गरज आहे. तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा, त्यांना त्याचे महत्त्व कळावे यासाठी दिग्दर्शक प्रवीण आंग्रे यांनी या नाटकाचे दोन प्रयोग चक्क मोफत ठेवले होते. यातला दुसरा प्रयोग आत्ताच १ फेब्रुवारीला माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरात दाखवण्यात आला. या नाटकाचे तब्बल ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत आणि त्यांना भरपूर गर्दी झाली होती असंही आंग्रे यांनी स्पष्ट केलं. समाजातील तळागाळात राहणाऱ्या लोकांना हा विषय कळणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मोफत प्रयोग ठेवले होते. आता एप्रिल महिन्यात आणखी दोन प्रयोग मोफत ठेवणार आहोत असं ते सांगतात.