आपोआप धावणाऱ्या इंजिनचा मोटरमनने बाईकने केला पाठलाग, कसाबसा लावला ब्रेक

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । वाडी

मोटरमनशिवाय गाडी चालल्याचे प्रकार आपण सिनेमात पाहिले असतील. मात्र वाडी रेल्वेस्थानकावर असाच एक नाट्यमय प्रकार पाहायला मिळाला आहे. मोटरमनशिवाय रेल्वेचे इंजिन १३ किलोमीटरपर्यंत धावल्याची घटना बुधवारी घडली आहे. मोटरमनशिवाय धावणाऱ्या या इंजिनला गाठण्यासाठी मोटरमनने बाईकने पाठलाग केला आणि तब्बल १३ किमी किलोमीटरचा प्रवास करून इंजिनला थांबवण्यात तो यशस्वी ठरला. साधारण २० मिनिटं हा नाट्यमय प्रकार सुरू होता.

चेन्नईहून मुंबई मेल प्रवासी आणि सामानासह दुपारी ३ वाजेपर्यंत वाडी रेल्वेस्थानकात दाखल झाली होती. विद्युत मार्ग वाडी येथे समाप्त झाल्यामुळे वाडी ते सोलापूर या प्रवासासाठी रेल्वेला डिझेल इंजिन जोडण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर नेहमीप्रमाणे इंजिनची बोगीपासून वेगळं करण्यात आलं आणि गाडी त्याच्या मार्गावर गेली. प्लॅटफॉर्मवर इंजिन उभं होतं आणि मोटरमन दुपारी ३.३० च्या सुमारास बाहेर पडला. काही क्षणातच इंजिन आपोआपच धावू लागले. हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आला.

वाडीस्थानकावरील अधिकाऱ्यांनी लगेचच पुढील काही स्थानकांना सिग्नल आणि ट्रॅक मोकळा करण्यासाठी आणि उलट दिशेने येणाऱ्या काही गाड्या बंद करण्यास सांगितले. ताशी ३० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या इंजिनचा गाठण्यासाठी वाडी स्टेशनचे व्यवस्थापक जे.एन. पॅरीस आणि मोटरमन यांनी बाईकचा आधार घेतला आणि इंजिनला गाठून ते थांबविण्यात ते यशस्वी ठरल्यानंतर हा संपूर्ण नाट्यमय प्रवास थांबला. या इंजिनमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र हा संपूर्ण प्रकार नेमका कसा घडला याबाबत माहिती विचारल्यास रेल्वे प्रशासनाने मौन बाळगले आहे.