स्वयंचलित गाडी

अमित घोडेकर, [email protected]

इन्फोसिसने स्वयंचलित गाडी आणण्याचे ठरविले आहे. तंत्रज्ञानातील आपले अजून एक पुढचे पाऊल…

जगातील सगळ्यात मोठी तंत्रज्ञान कंपनी गुगल आणि जगातील मोठी खासगी टॅक्सी चालवणारी कंपनी उबर हे सध्या ड्रायव्हरलेस कारचे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत आणि सगळ्या जगाला याची माहिती होती. दोन्ही कंपन्या जवळपास या तंत्रज्ञान असणाऱया कार्स कधीही आपल्यासमोर आणू शकतात असे मानले जात होते पण कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट आला आहे. त्याचे कारणदेखील तसेच घडले आहे. हिंदुस्थानची सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने नुकतीच अशी काही घोषणा केली की सगळे टेक जगत आश्चर्यचकित झाले आहे.

इन्फोसिस ही जगातील सगळ्यात मोठय़ा सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे आणि जगातील अनेक ठिकाणी लाखो लोक सॉफ्टवेअर बनवण्याचे काम करतात. त्यातही गेल्या काही वर्षांपासून इन्फोसिसची कामगिरी तशी एवढी काही खास नव्हती. नारायण मूर्ती आणि नंदन निलेकणी यांच्यानंतर विशाल सिक्का यांच्याकडे इन्फोसिसची जबाबदारी आली होती पण इन्फोसिसची कामगिरी ढासळतच चालली होती. सध्या मात्र सगळे काही वेगळेच घडले. इन्फोसिसच्या तिमाही कामगिरीची माहिती देण्यासाठी विशाल सिक्का त्यांच्या मैसूरमधल्या कार्यालयात एका गोल्फ कार्ट (कार)मधून आले. या गाडीत कोणीही ड्रायव्हर नव्हता.

विशाल सिक्काने प्रथम इन्फोसिसचा तिमाही निकाल घोषित केला. प्रथमच इन्फोसिसने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.  त्यानंतर जगातील मोठमोठय़ा दादा कंपन्यांना मागे पछाडून इन्फोसिसने ड्रायव्हरलेस असणारी कार बनवली असल्याची घोषणादेखील केली. अशी कार जी संपूर्ण रोबोटिक तंत्रज्ञानावर चालणार आहे. रोबोटिक कार म्हणजे भविष्यात तुम्ही जर तुमच्या मोबाईलवरून उबेरची किंवा ओलाची टॅक्सी बुक केली तर कदाचित तुमच्यासमोर ड्रायव्हर नसलेली कार येऊन थांबेल. पण घाबरू नका कदाचित तुम्हीदेखील स्वतःची कार चालवण्यापेक्षा ड्रायव्हरलेस कारलाच पसंती द्याल.

जग सध्या ड्रायव्हरलेस कारच्या मागे का लागले आहे. त्याचे कारण म्हणजे कदाचित ड्रायव्हरलेस कारमुळे ट्रॅफिक किंवा गुंतागुंतीच्या रस्त्यावर संगणक चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतो. त्याच बरोबर ड्रायव्हरच्या चुकांमुळे होणारेॅ अपघात मोठय़ा प्रमाणावर कमी होऊ शकतात आणि ड्रायव्हरलेस कारमुळे मोठय़ा प्रमाणात अनेक ठिकाणी खासगी कारची सेवा देता येऊ शकते. ड्रायव्हरलेस कार्समुळे मोठय़ा प्रमाणात रोजगारात कपातदेखील होणार आहे. त्यामुळे ड्रायव्हरलेस कारचे सत्य स्वप्नात राहते की खरंच ते सत्यात उतरतं हे काळच ठरवेल पण इन्फोसिसने ड्रायव्हरलेस कार बनवून जगाला दाखवून दिले आहे की हम भी किसीसे कम नही.