नांदेड-परभणी जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस

सामना प्रतिनिधी । नांदेड/परभणी

नांदेड, परभणी जिल्ह्यात सोमवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू आहे. नांदेडच्या मुखेड व देगलूर तालुक्यात दमदार पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. नांदेड शहरात सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे. माहूर, हदगाव आणि किनवट तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी जोर धरला आहे. परभणी जिल्ह्यातही जिंतूर, सेलू, पाथरी तालुक्यांत सर्वदूर रिमझिम पाऊस होता.

नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत २३७.७४ मि.मी.पाऊस झाला असून, मुखेड, बिलोली आणि देगलूर तालुक्यात हवा तसा पाऊस झालेला नाही. हदगाव तालुक्यात ३१ मि.मी., माहूर तालुक्यात २७.२५ मि.मी., किनवट तालुक्यात १०.८६ मि.मी. पाऊस झाला असून यामुळे या तालुक्यात पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. धर्माबाद तालुक्यात देखील बरा पाऊस असून आज ११ मि.मी. पाऊस झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. आज १४.१२ मि.मी. पाऊस झाला असून, रिमझिम सुरूच आहे. अनेक भागात या पावसामुळे चिखल झाला असून काही भागात ड्रेनेज दुरुस्तीचे व पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

परभणी जिल्ह्यात सर्वदूर सकाळपासून सायंकाळपर्यंत बरसला. काहीवेळा पावसाचा जोर वाढला तर काहीवेळा पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनच झाले नाही. जिल्ह्यात आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आज पहिल्यांदाच जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने छोट्या-मोठ्या नदी नाल्यांना पूर आला. अनेक भागातील संपर्क तुटल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.