अशी असणार ड्रोन नियमावली

हिंदुस्थानात ड्रोनचा वापर विविध कामांसाठी वाढत चाललेला असला तरी अजूनही या ड्रोन उड्डाणाबाबत नियमावली अशी बनलेली नव्हती. कायद्याच्या कक्षेत आणू शकणारे याचे नियम आता लवकरच जाहीर होणार आहेत. ड्रोनच्या मदतीने फोटोग्राफी करणारे हौशी फोटोग्राफर ते ड्रोनचा व्यावसायिक वापर करणाऱ्या सर्वच क्षेत्रांतील वापरकर्त्यांना आता ही नियमावली लागू होणार आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनतर्फे नुकतीच याबद्दल माहिती देण्यात आली. या नियमावलीचा मसुदा तयार करून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. लवकरच त्यावर अधिक चर्चा, बदल करून मुख्य नियमावली महिनाभरात घोषित केली जाणार आहे. यापुढे देशात चार गटांत ड्रोन्सची विभागणी करण्यात येणार आहे. नॅनो, मायक्रो, मिनी आणि स्मॉल अशा वर्गात यांची नोंदणी होणार आहे. यापुढे देशात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक ड्रोन मॉडेलला युनिक आयडेंटिफिकेशन प्रदान करण्यात येणार आहे, तर संसदेसह देशातील महत्त्वाच्या असलेल्या इमारती, संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील असणारी ठिकाणे, आंतरराष्ट्रीय सीमारेषा तसेच कोणत्याही विमानतळाच्या परिसरात ड्रोन उड्डाण करणे बेकायदेशीर ठरवले जाणार आहे.