श्रीलंकेत ड्रोन, वैमानिकरहित विमानांना बंदी

2

सामना ऑनलाईन । कोलंबो

कोलंबोत रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर, श्रीलंकेत ड्रोन आणि वैमानिकरहित विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बॉम्बस्फोटांचा तपास पोलीस आणि लष्कराच्या मदतीने सुरूच असून आणखी 16 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची संख्या 75 झाली आहे. देशभरात 5 हजार सैनिक तर 6 हजार 300 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, संरक्षण सचिव हेमसिरी फर्नांडो यांनी राजीनामा दिला.

हल्लेखोरांच्या वडिलांना अटक

9 हल्लेखोरांपैकी दोघे भाऊ असून त्यांच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली. मसाल्याचे व्यापारी मोहम्मद युसूफ इब्राहिम यांच्या दोघा मुलांचा साखळी बॉम्बस्फोटांत सहभाग होता. बॉम्बस्फोट करण्यात मुलांना मदत करणे आणि मुलांना गुन्हा करण्यास मदत केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. इहाम आणि इमसथ अशी तरुणांची नावे असून त्यांनी दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणले.

छाप्यात 21 हातबॉम्ब, 6 तलवारी जप्त

सीआयडी आणि विशेष कृती दलाने मोडारा भागात टाकलेल्या छाप्यात तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक व्हॅन, 21 हातबॉम्ब आणि 6 तलवारी जप्त करण्यात आल्या.

कट 7-8 वर्षे आधीच  रचला गेला असावा

इस्टर सणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या हल्ल्याचा कट गेल्या 7-8 वर्षे आधीच रचला गेला असावा आणि त्याची अंमलबजावणी लिट्टेसारख्या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याने केली असावी, अशी शक्यता श्रीलंकेचे फिल्ड मार्शल सरथ फोन्सेका यांनी व्यक्त केली आहे.