ड्रोनने होणार रक्त आणि जीवनावश्यक लसींचा पुरवठा

प्रतिनिधी, नागपूर

उपराजधानीसह मध्य भारतात भविष्यात गंभीर रुग्णांसाठी स्वयंचलित ड्रोनच्या मदतीने हवाई मार्गाने रक्तांसह जीवनावश्यक लसींचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी जीपीएससह अद्यायावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. देशाच्या काही भागात याचे प्रात्यक्षिक सुरू असून नागपूरसह मध्य भारतात २०१९ ते २०२० दरम्यान ही सेवा उपलब्ध होईल, असा दावा ब्लडस्ट्रीम ड्रोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल शर्मा यांनी आज गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, देशातील आदिवासी दुर्गम भागासह इतरही काही भागात आजही प्रसूतीदरम्यान होणार्‍या अतिरिक्त रक्तस्रावाने दर तासाला पाच महिला दगावतात. ही संख्या त्याहूनही जास्त असू शकते. दुसरीकडे देशात ३० लाख युनिट रक्त पिशव्या कमी पडत असताना वेगवेगळ्या कारणांनी ११ लाख युनिट पिशव्या रक्त खराब होत असल्याने फेकून द्याव्या लागतात. प्रगत तंत्रज्ञानाची कास धरून हे रक्त वेळीच रुग्णांपर्यंत पोहोचून अनेक मृत्यू टाळता येतात. त्यासाठी हवाई मार्गाने ड्रोनद्वारे देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यातील संबंधित रुग्णालयात वेळीच रक्त पोहोचवणे शक्य आहे. या पद्धतीमुळे सध्याच्या तुलनेत फार कमी अवधीत हे रक्त अत्यवस्थ रुग्णापर्यंत पोहोचू शकते. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, नेपाळसारख्या १९ ठिकाणी ही सेवा उपलब्ध करण्याचा मानस आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारही सकारात्मक असून या सेवेबाबत प्राथमिक मंजुरी मिळाली असल्याची माहितीही अंशुल शर्मा यांनी दिली. याप्रसंगी अर्नाह भट्टाचार्य, दीपक मेनारिया, डॉ. हरीश वरभे उपस्थित होते.

असा होणार रक्तपुरवठा

रुग्णांच्या नातेवाईकांकडून विशिष्ट गटाच्या रक्ताची मागणी होताच तातडीने ते उपलब्ध असलेल्या रक्तपेढीच्या छतावर ड्रोनची सोय केली जाईल. रक्त उपलब्ध झाल्यावर ड्रोनच्या विशिष्ट डब्यात ते ठेवले जाईल. त्यानंतर हे ड्रोन रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयाकडे सॉफ्टवेअरमधील स्वयंचलित यंत्रणेच्या मदतीने उड्डाण करेल. कोणत्या जागेवर रक्त पोहोचवायचे ते जीपीएस यंत्रणेवर नमूद केलेले असेल. त्यामुळे रुग्णालयाच्या ठराविक जागेवर लहान पॅराशूटच्या मदतीने हवेतून रक्तपिशव्या सोडल्या जातील. रक्त निश्चत ठिकाणी पोहोचण्यापूर्वी ही माहिती संबंधिताला दिली जाईल. रक्त नियोजित ठिकाणी पोहोचले की ते तातडीने रुग्णाला उपलब्ध होईल.