महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईवर ड्रोनची नजर

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईसारख्या महानगरात महिलांची सुरक्षा म्हणजे पोलीस यंत्रणेसमोर आव्हानच. मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस अथक परिश्रम घेत असतात. त्यांच्या परिश्रमांना आता अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड लाभणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईवर मानवरहित ड्रोनने नजर ठेवली जाणार आहे. मुंबईत सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर पहिल्यांदाच केला जाणार आहे. याशिवाय धोक्याची सूचना देणारी ‘पॅनिक बटणे’ शहरभर लावली जाणार आहेत. भुयारी मार्ग आणि स्कायवॉक्सवर दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.

‘सेफ सिटी’ प्रकल्पांतर्गत हे सुरक्षा उपाय केले जाणार असून त्यासाठी २५२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त के. एम. एम. प्रसन्ना यांनी दिली. २०१२ मध्ये ‘निर्भया’ सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर केंद्रीय गृहखात्याने मोठय़ा शहरांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. संबंधित शहरांमधील पोलीस विभागांकडून त्यासाठी प्रस्ताव मागवले गेले होते.

या प्रकल्पाचा ६० टक्के खर्च केंद्र सरकार देणार आहे. राज्य सरकारनेही हा प्रकल्प राबवण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि सहआयुक्त (गुन्हे) संजय सक्सेना यांच्या देखरेखीखाली पुढील तीन वर्षांत या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल असे प्रसन्ना यांनी सांगितले.

पॅनिक बटण दाबताच पोलीस हजर
अद्ययावत जियोग्राफिक इन्फर्मेशन सिस्टमचा (जीआयएस) वापर करून मुंबईचे नकाशे काढले जाणार आहेत. महिलांसंदर्भात गुन्हे सतत घडत असतात असे प्रत्येक ठिकाण जाणून घेऊन तिथे ‘पॅनिक बटण’ लावले जाईल. हे बटण दाबताच संबंधित पोलीस ठाण्याला तातडीने सिग्नल जाईल आणि पोलीस घटनास्थळी पोहचतील.

प्रवासी वाहनांना क्यूआर कोडस् आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅग
महिला या बसेस, टॅक्सी आणि रिक्षामधून जास्त प्रवास करतात. त्यामुळे या वाहनांना क्यूआर कोडस् आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन (आरएफआयडी) टॅग्ज पुरवण्याचीही योजना आहे. जेणेकरून गुन्हा घडल्यास अशी वाहने शोधणे सोपे होईल असे प्रसन्ना यांनी सांगितले.

भुयारी मार्ग, स्कायवॉकवर आणखी दीड हजार सीसीटीव्ही
मुंबईत सुरक्षेसाठी पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले आहेत. आणखी दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्याद्वारे भुयारी मार्ग आणि स्कायवॉकवरील हालचालींवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. असे ५००भुयारी मार्ग आणि स्कायवॉकवर हे कॅमेरे बसवले जातील अशी माहिती प्रसन्ना यांनी दिली.